अधिकार आमचा न्युज नेटवर्क
संपादक गफ्फार शेख (मलिक)
उपसंपादक रोहित शिंदे
भुसावळ (प्रतिनिधी) – भुसावळ शहरात घडलेल्या घरफोडीच्या घटनेचा छडा अवघ्या दोन दिवसांत लावत भुसावळ बाजारपेठ पोलीस स्टेशनच्या डी.बी. पथकाने उल्लेखनीय कामगिरी केली आहे. या कारवाईत सुमारे 5 लाख 70 हजार रुपयांच्या सोन्याचांदीच्या दागिन्यांसह रोख रक्कम चोरी करणाऱ्या आरोपीस ताब्यात घेण्यात आले असून मोठा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, दिनांक 30 मार्च 2026 रोजी भुसावळ बाजारपेठ पोलीस स्टेशन येथे गु.र.नं. 159/2026, बीएनएस 2023 अंतर्गत कलम 305 (अ), 331(3), 331(4) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता. फिर्यादी वसीम अहमद अब्दुल बासीद शेख (रा. फातेमा कॉलनी, भुसावळ) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, ते दिनांक 28 ते 30 मार्च दरम्यान घराला कुलूप लावून बाहेरगावी गेले असताना अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या घरात घुसून सुमारे 5.70 लाख रुपये किंमतीचे सोन्याचांदीचे दागिने व रोख रक्कम चोरून नेली होती.
सदर गुन्ह्याच्या तपासासाठी पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी, अप्पर पोलीस अधीक्षक अशोक नखाते, उपविभागीय पोलीस अधिकारी केदार बारबोले व पोलीस निरीक्षक राहुल वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली डी.बी. पथकाने तपासाची चक्रे वेगाने फिरवली.
गुप्त बातमीदाराकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी अमीर खान हबीब खान (वय 35, रा. न्यू ईदगाह परिसर, भुसावळ) यास ताब्यात घेतले. चौकशीदरम्यान आरोपीने एका विधीसंघर्ष बालकाच्या साथीने घरफोडी केल्याची कबुली दिली. पोलिसांनी आरोपीकडून 4,99,100 रुपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.
न्यायालयाने आरोपीस तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक राजू सांगळे हे वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली करीत आहेत.
