अधिकार आमचा न्युज नेटवर्क
संपादक गफ्फार शेख (मलिक)
उपसंपादक रोहित शिंदे
चाळीसगाव (प्रतिनिधी) – शहरातील हिरापुर रोड परिसरात घरफोडीची घटना उघडकीस आली असून अज्ञात चोरट्यांनी बंद घर फोडून सुमारे 2 लाख 53 हजार 400 रुपयांचा मुद्देमाल लंपास केला आहे. याप्रकरणी चाळीसगाव शहर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, आबासाहेब देवराम जाधव (वय 62, रा. सुयश लॉन्सजवळ, हिरापुर रोड, चाळीसगाव) हे आपल्या पत्नीसह वास्तव्यास असून त्यांचा मुलगा पुणे येथे नोकरीनिमित्त राहतो. जाधव दाम्पत्य दिनांक 24 मार्च 2026 रोजी मुलाकडे पुणे येथे गेले होते. घराला व्यवस्थित कुलूप लावून ते निघाले होते.
30 मार्च रोजी सायंकाळी शेजारी धनराज गायकवाड यांनी जाधव यांना फोन करून घराचा दरवाजा वाऱ्यामुळे आपटत असल्याची माहिती दिली. त्यानंतर त्यांच्या मुलाने पाहणी केली असता दरवाज्याच्या कड्या तुटलेल्या असल्याचे आढळले. ही माहिती मिळताच नातेवाईकांनी घरात जाऊन पाहणी केली असता घरातील सामान अस्ताव्यस्त अवस्थेत पडलेले दिसले.
जाधव दाम्पत्य घरी परतल्यानंतर तपासणी केली असता घरातील कपाटे उघडून त्यातील सोन्या-चांदीचे दागिने व रोख रक्कम चोरीला गेल्याचे स्पष्ट झाले. यात मंगळसूत्र, नेकलेस, कानातील दागिने, नथ, रिंग, तसेच चांदीच्या मूर्ती, चैन, पैंजण आदी वस्तूंचा समावेश असून एकूण 75 ग्रॅम सोन्याचे व 43 भार चांदीचे दागिने तसेच 3,500 रुपये रोख रक्कम असा एकूण 2,53,400 रुपयांचा ऐवज चोरट्यांनी लंपास केला आहे.
ही चोरी 24 मार्च रात्री 9 वाजेनंतर ते 30 मार्च सायंकाळी 8 वाजेच्या दरम्यान घडल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. अज्ञात चोरट्यांनी घराचे कुलूप तोडून आत प्रवेश करून ही चोरी केल्याचे फिर्यादीत नमूद आहे. दिलेल्या फिर्यादीवरून या प्रकरणी चाळीसगाव शहर पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे.
