अधिकार आमचा न्युज नेटवर्क
संपादक गफ्फार शेख (मलिक)
उपसंपादक रोहित शिंदे
मुक्ताईनगर(प्रतिनिधी)-जळगाव जिल्ह्यात वाढत्या वाहनचोरीच्या घटनांना आळा घालण्यासाठी पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांच्या आदेशानुसार मुक्ताईनगर पोलिसांनी मोठी कारवाई करत २९ चोरीच्या मोटारसायकली जप्त केल्या आहेत. या वाहनांची अंदाजे किंमत २५ लाख ८० हजार रुपये असून, या प्रकरणी दोन आरोपी व दोन अल्पवयीन संशयितांना ताब्यात घेण्यात आले आहे.
मुक्ताईनगर पोलीस ठाण्यात २६ जून २०२६ रोजी दाखल झालेल्या गुन्हा क्रमांक २७३/२०२६ (भारतीय न्याय संहिता कलम ३०३(२)) च्या तपासादरम्यान तांत्रिक माहितीचे विश्लेषण आणि गुप्त बातमीदाराच्या माहितीच्या आधारे विशाल सुरेश सोनवणे (रा. पिंपरुड, ता. यावल), कुंदन सुनिल महाले (रा. सालबर्डी, ता. मुक्ताईनगर) तसेच दोन अल्पवयीन संशयितांना ताब्यात घेण्यात आले.
चौकशीदरम्यान संशयितांनी सदर गुन्ह्यातील मोटारसायकलसह आणखी २९ मोटारसायकली चोरी केल्याची कबुली दिली. चोरी केलेल्या दुचाकी विविध रेल्वे स्थानके व बसस्थानकांवरील पे-अँड-पार्किंगमध्ये उभ्या करून तेथूनच ग्राहकांना विक्री करण्याची त्यांची पद्धत असल्याचे तपासात समोर आले.
जप्त करण्यात आलेल्या मोटारसायकली महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांमध्ये नोंदणीकृत असून, गुजरातमधील उधना (सुरत) तसेच कल्याण, नेरुळ, निफाड, वणी, इगतपुरी, गंगापूर, ओझर, सरकारवाडा, नेरळ, पारोळा, जिल्हापेठ आणि एरंडोल पोलीस ठाण्यांमध्ये या वाहनचोरीचे गुन्हे दाखल असल्याचे निष्पन्न झाले आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक संदीप गावीत आणि उपविभागीय पोलीस अधिकारी केदार बारबोले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक आशिष आडसूळ यांच्या नेतृत्वात पोहेकॉ. अजय खंडेराव, पोहेकॉ. महेंद्र सुरवाडे, पोलीस नाईक असिम तडवी, पोलीस नाईक कल्पेश आमोदकर, पोलीस अंमलदार संदीप धनगर, सुनिल मोरे, चेतन महाजन, रविंद्र धनगर, प्रशांत चौधरी, रमेश खोडपे, दीपक ढाकरे, स्वप्निल पवार आणि अक्षय वाढे यांनी यशस्वीरीत्या पार पाडली.
या कारवाईमुळे आंतरजिल्हा वाहनचोरी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश झाला असून, आणखी गुन्ह्यांचा उलगडा होण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे.
