अधिकार आमचा न्युज नेटवर्क
संपादक गफ्फार शेख (मलिक)
उपसंपादक रोहित शिंदे
रावेर(प्रतिनिधी)-: रावेर पोलीस स्टेशनच्या वतीने पुरग्रस्त नागरिकांसाठी सामाजिक बांधिलकी जपत अन्नवाटपाचा उपक्रम राबविण्यात आला. अहीरवाडी गावातील सुमारे 140 ते 150 पुरग्रस्त ग्रामस्थांना रविवारी (दि. 28 जून) जेवणाचे वाटप करण्यात आले.
दि. 24 जून रोजी झालेल्या मुसळधार पावसामुळे रावेर पोलीस स्टेशन हद्दीतील अहीरवाडी गावात पुरस्थिती निर्माण झाली होती. नाल्याकाठी राहणाऱ्या अनेक कुटुंबांच्या घरांचे नुकसान झाले होते. त्यावेळी रावेर पोलीस स्टेशनचे नवनियुक्त पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांनी घटनास्थळी भेट देऊन परिस्थितीची पाहणी केली होती तसेच ग्रामस्थांच्या अडचणी जाणून घेतल्या होत्या.
याच पार्श्वभूमीवर पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांच्या संकल्पनेतून आज पुरग्रस्तांसाठी अन्नवाटपाचा उपक्रम राबविण्यात आला. या उपक्रमात पोलीस उपनिरीक्षक तुषार पाटील, पोलीस हवालदार सुनील वंजारी आणि पोलीस शिपाई तथागत सपकाळे यांनी सक्रिय सहभाग घेतला.
जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अप्पर पोलीस अधीक्षक संदीप गावीत यांच्या सामाजिक बांधिलकी जपणाऱ्या उपक्रमांच्या प्रेरणेतून तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी अनिल बडगुजर यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम राबविण्यात आला.
या मदतकार्याबद्दल पुरग्रस्त ग्रामस्थांनी रावेर पोलिसांचे आभार मानत समाधान व्यक्त केले.
