अधिकार आमचा न्युज नेटवर्क
संपादक गफ्फार शेख (मलिक)
उपसंपादक रोहित शिंदे
कन्नड(प्रतिनिधी)-बारामतीहून दस्तापूरकडे परतणाऱ्या उसतोड मजुरांच्या आयशर वाहनाला गौताळा घाटात भीषण अपघात झाला. घाटातील धोकादायक वळणावर वाहनाचे ब्रेक निकामी झाल्याने चालकाचा ताबा सुटला आणि आयशर सुमारे १०० फूट खोल दरीत कोसळली. या दुर्घटनेत ७ जण गंभीर तर ६ जण किरकोळ जखमी झाले आहेत.
ही घटना शनिवारी सकाळच्या सुमारास घडली. दस्तापूर (ता. सोयगाव) येथील मजूर बारामती येथे उसतोडीचे काम करून आपल्या गावी परतत होते. कन्नड–नगर मार्गावरील गौताळा अभयारण्य परिसरात अचानक ब्रेक फेल झाल्याने वाहन संरक्षण भिंतीवर आदळले आणि दोन पलट्या घेत दरीत कोसळले.
अपघाताची माहिती मिळताच स्थानिक ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेत बचावकार्य सुरू केले. जखमींना तातडीने कन्नड ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यानंतर गंभीर जखमींना पुढील उपचारासाठी छत्रपती संभाजीनगर येथील घाटी रुग्णालयात हलविण्यात आले.
जखमींची नावे :
महेश अंडुरे (चालक, रा. खेड, पुणे), अशोक पवार (४५), कोमल हिरालाल पवार (८), प्रतीक प्रविण वाघ (४), प्रविण बापू वाघ (३०), सलीम जमाल तडवी (४५, रा. दस्तापूर, ता. सोयगाव) यांच्यासह इतर काही जण जखमी झाले आहेत.
या अपघाताची माहिती मिळताच निरीक्षक कन्नड ग्रामीणचे सहाय्यक पोलिस रामचंद्र पवार यांनी सहकाऱ्यांसह घटनास्थळी धाव घेतली.
