अधिकार आमचा न्युज नेटवर्क
संपादक गफ्फार शेख (मलिक)
जळगाव (प्रतिनिधी) – मकर संक्रांतीच्या पार्श्वभूमीवर पतंगबाजीसाठी वापरण्यात येणाऱ्या प्रतिबंधित नायलॉन मांजाच्या विक्रीविरोधात शनिपेठ पोलीस ठाण्याने कडक कारवाई करत दोन तरुणांना ताब्यात घेतले आहे. या कारवाईत एकूण २० नायलॉन मांजा रिळे, अंदाजे २० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
दरवर्षी डिसेंबर व जानेवारी महिन्यात मकर संक्रांतीच्या निमित्ताने तसेच छंद म्हणून पतंग उडवण्याचे प्रमाण वाढते. मात्र अनेक ठिकाणी वापरण्यात येणारा नायलॉनपासून बनवलेला मांजा (नायलॉन मांजा) हा अत्यंत घातक ठरत आहे. हा मांजा इमारती, झाडे यामध्ये अडकतो आणि सहज तुटत नसल्याने दुचाकीस्वार, सायकलस्वार विद्यार्थी व पादचाऱ्यांच्या गळ्यात अडकून गंभीर जखमा तसेच जीवितहानी होण्याच्या घटना वाढत आहेत. याशिवाय पक्षी व प्राण्यांच्या जीवाला धोका निर्माण होत असून हा मांजा अविघटनशील असल्याने पर्यावरणाचेही मोठे नुकसान होत आहे. यामुळे शासनाने नायलॉन मांजाची विक्री व वापर पूर्णतः प्रतिबंधित केला आहे.
दिनांक ०७ जानेवारी २०२६ रोजी दुपारी सुमारे १.२० वाजता शनिपेठ पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षक श्रीमती कावेरी कमलाकर यांना मिळालेल्या गुप्त माहितीनुसार शनिपेठ हद्दीत नायलॉन मांजाची चोरटी विक्री सुरू असल्याची माहिती मिळाली. या माहितीच्या आधारे पोलीस उपनिरीक्षक योगेश ढिकले व सहकाऱ्यांनी तात्काळ कारवाई करत छापा टाकला.
या कारवाईत
रितांशू नरेंद्र चौधरी (वय १९, रा. ओक मंगल कार्यालयाच्या मागे, शनिपेठ, जळगाव) याच्याकडून १२ हजार रुपये किमतीची १५ नायलॉन मांजा रिळे,
आलोक ज्ञानेश्वर भोसले (वय २०, रा. रिधूरवाडा, जळगाव) याच्याकडून ८ हजार रुपये किमतीची १० नायलॉन मांजा रिळे जप्त करण्यात आली.
दोन्ही आरोपींविरुद्ध शनिपेठ पोलीस ठाणे CCTNS क्रमांक ०३/२०२६ व ०४/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम २२३ तसेच पर्यावरण संरक्षण अधिनियम १९८६ चे कलम ५ व १५ अंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
जळगाव जिल्हा पोलीस दलाकडून पुढील काळात नायलॉन मांजाच्या विक्री व वापरावर अधिक कडक नजर ठेवण्यात येणार असून मोकळ्या मैदानांमध्ये ड्रोनद्वारे नायलॉन मांजाचा वापर करणाऱ्यांवर पाळत ठेवली जाणार आहे. ही मोहीम अधिक तीव्र करण्यात येणार असल्याचे पोलिसांकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
दरम्यान, नागरिकांना आवाहन करण्यात येते की आपल्या परिसरात कोणीही नायलॉन मांजाची विक्री किंवा वापर करत असल्याचे आढळल्यास तात्काळ नजीकच्या पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा किंवा टोल फ्री क्रमांक ११२ वर माहिती द्यावी. माहिती देणाऱ्याचे नाव गोपनीय ठेवण्यात येईल, असे पोलिसांनी सांगितले.
ही कारवाई पोलीस अधीक्षक जळगाव, अप्पर पोलीस अधीक्षक जळगाव परिमंडळ, उपविभागीय पोलीस अधिकारी (जळगाव शहर) यांच्या मार्गदर्शनाखाली, पोलीस निरीक्षक श्रीमती कावेरी कमलाकर यांच्या नेतृत्वाखाली पोलीस उपनिरीक्षक योगेश ढिकले, प्रशिक्षणार्थी पोलीस उपनिरीक्षक संतोष खेडकर, पोलीस हवालदार प्रदीप नन्नावरे, पोलीस कॉन्स्टेबल नवजीत चौधरी व रविंद्र तायडे यांनी यशस्वीरीत्या पार पाडली.
