अधिकार आमचा न्युज नेटवर्क
संपादक गफ्फार शेख (मलिक)
चाळीसगाव(प्रतिनिधी)- नागरिकांच्या दैनंदिन नागरी समस्या अधिक सोप्या, थेट व जलद पद्धतीने नगरपरिषदपर्यंत पोहोचाव्यात, या उद्देशाने चाळीसगाव नगरपरिषदेच्या वतीने एक आधुनिक व सुलभ “तक्रार निवारण मोबाईल ॲप” विकसित करण्यात आले असून, या ॲपचे लोकार्पण लोकनियुक्त नगराध्यक्षा सौ. प्रतिभा मंगेश चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आले.
अनेकदा स्वच्छता, पाणीपुरवठा, रस्ते, स्ट्रीट लाईट, अग्निशमन यांसारख्या मूलभूत नागरी समस्यांसाठी नागरिकांना नगरपरिषद कार्यालयात प्रत्यक्ष येऊन तक्रार नोंदवावी लागते. त्यासाठी वेळ व कधी कधी गैरसोयही सहन करावी लागते. ही अडचण दूर करण्यासाठी चाळीसगाव नगरपरिषदेचे मुख्याधिकारी श्री. सौरभ जोशी यांच्या मार्गदर्शनाखाली हे डिजिटल तक्रार निवारण ॲप विकसित करण्यात आले आहे.
या मोबाईल ॲपच्या माध्यमातून नागरिकांना आपल्या मोबाईलवरूनच नागरी तक्रारी नोंदविता येणार असून, संबंधित विभागामार्फत त्यावर तात्काळ कार्यवाही करण्यात येणार आहे. तक्रारींची स्थितीही नागरिकांना ॲपवरून पाहता येणार असल्याने पारदर्शकता वाढण्यास मदत होणार आहे.
नगराध्यक्षा सौ. प्रतिभा चव्हाण यांनी यावेळी नागरिकांना आवाहन करताना सांगितले की, “चाळीसगाव शहरातील सर्व नागरिकांनी Google Play Store वरून Takrar Nivaran Chalisgaon NP हे ॲप डाउनलोड करून आपल्या समस्या थेट नगरपरिषदेकडे नोंदवाव्यात. नागरिकांच्या सेवेसाठी नगरपरिषद सदैव तत्पर असून, डिजिटल माध्यमातून सेवा अधिक प्रभावी करण्याचा आमचा प्रयत्न आहे.”
ॲप डाउनलोड करण्यासाठी खालील लिंक ला क्लिक करा
https://play.google.com/store/apps/details?id=com.infotechincorporate.takrar_nivaran
डिजिटल तंत्रज्ञानाच्या माध्यमातून नागरी सेवा अधिक गतिमान करण्याच्या दिशेने टाकलेले हे पाऊल “डिजिटल चाळीसगाव” संकल्पनेला बळ देणारे ठरणार असल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.
