अधिकार आमचा न्युज नेटवर्क
संपादक गफ्फार शेख (मलिक)
चाळीसगाव (प्रतिनिधी)- राष्ट्रीय सहकारी शिक्षण प्रसारक मंडळ लिमिटेड, चाळीसगाव या संस्थेत सभासद होण्यासाठी नागरिकांचा मोठा प्रतिसाद मिळत असून, यासाठी आवश्यक असलेल्या डिमांड ड्राफ्टसाठी शहरातील विविध बँकांमध्ये नागरिकांची मोठ्या प्रमाणावर गर्दी होत आहे. मात्र, अनेक बँकांमध्ये डिमांड ड्राफ्ट उपलब्ध नसल्याने नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे.
नागरिकांच्या म्हणण्यानुसार, काही बँकांमध्ये “डिमांड ड्राफ्ट शिल्लक नाही” असे सांगून परत पाठवले जात आहे, तर काही बँकांमध्ये ओळखीच्या किंवा ‘तोंड पाहून’च डिमांड ड्राफ्ट दिला जात असल्याचा आरोप नागरिकांकडून केला जात आहे. यामुळे सर्वसामान्य नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे.
सभासद नोंदणीसाठी ठराविक कालमर्यादा असल्याने नागरिकांना बँक-बँक फिरावे लागत असून, वेळ व पैशांचा अपव्यय होत आहे. अनेक नागरिक सकाळपासून बँकांच्या चक्रा मारून व बँकांमध्ये उभे राहूनही रिकाम्या हाताने परतावे लागत असल्याचे चित्र शहरात पाहायला मिळत आहे.
या प्रकारामुळे बँक व्यवस्थापनाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, सर्व बँकांनी समान व पारदर्शक पद्धतीने डिमांड ड्राफ्ट उपलब्ध करून द्यावेत, अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे. तसेच संबंधित वरिष्ठ बँक अधिकारी व प्रशासनाने या प्रकरणात तातडीने लक्ष घालून नागरिकांना दिलासा द्यावा, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
