अधिकार आमचा न्युज नेटवर्क
संपादक गफ्फार शेख (मलिक)
उपसंपादक रोहित शिंदे
पिंपळगाव हरे(प्रतिनिधी)-जळगाव जिल्ह्यात अवैधरित्या घातक शस्त्रे व अग्निशस्त्रे बाळगणाऱ्यांविरुद्ध सुरू असलेल्या मोहिमेत पिंपळगाव (हरे) पोलिसांनी मोठी कारवाई करत गावठी बनावटीचे पिस्तूल बाळगणाऱ्या एका आरोपीला अटक केली आहे. आरोपीकडून सुमारे २० हजार रुपये किमतीचे मॅगझीनसह गावठी पिस्तूल जप्त करण्यात आले आहे.
पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाण्यांना अवैध शस्त्रधारकांविरुद्ध कठोर कारवाई करण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यानुसार पिंपळगाव (हरे) पोलीस ठाण्याच्या प्रभारी अधिकारी कल्याणी वर्मा यांनी अधिकारी व कर्मचाऱ्यांना गुप्त माहितीच्या आधारे कारवाई करण्याचे आदेश दिले होते.
शनिवार (१३ जून) रोजी गुप्त बातमीदारामार्फत सातगाव (ता. पाचोरा) परिसरात किशोर लक्ष्मण पाटील हा इसम कमरेला गावठी कट्टा लावून फिरत असल्याची खात्रीशीर माहिती मिळाली. त्यानंतर पोहेकॉ. अतुल पवार यांच्या पथकाने सापळा रचून संशयितास ताब्यात घेतले.
चौकशीदरम्यान आरोपी समाधानकारक उत्तरे देऊ शकला नाही. अंगझडती घेतली असता त्याच्या ताब्यातून मॅगझीनसह गावठी बनावटीचे पिस्तूल जप्त करण्यात आले.
अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव किशोर लक्ष्मण पाटील (वय ३२, रा. पिंप्री, ता. पाचोरा, जि. जळगाव) असे असून त्याच्याविरुद्ध पिंपळगाव हरे पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक २९४/२०२६ अन्वये भारतीय हत्यार कायदा कलम ३/२५ तसेच मुंबई पोलीस अधिनियम १९५१ चे कलम ३७(१) व (३) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक विठ्ठल पवार करीत आहेत.
ही कारवाई पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते आणि उपविभागीय पोलीस अधिकारी बापू रोहम यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक कल्याणी वर्मा यांच्या नेतृत्वात पोहेकॉ. अतुल पवार, अभिजित निकम, राहुल बेहेरे, अमोल पाटील, प्रमोद वाडीले आणि नामदेव इंगळे यांच्या पथकाने यशस्वीरीत्या पार पाडली.
