अधिकार आमचा न्युज नेटवर्क
संपादक गफ्फार शेख (मलिक)
उपसंपादक रोहित शिंदे
चाळीसगाव(प्रतिनिधी)-महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळ (बालभारती), पुणे यांच्या वतीने समग्र शिक्षा अभियान व पीएमश्री योजनेंतर्गत शैक्षणिक वर्ष 2026-27 साठी मोफत पाठ्यपुस्तक वितरण प्रक्रियेला चाळीसगाव तालुक्यात प्रारंभ झाला आहे.
नवीन शैक्षणिक वर्ष सुरू होण्यापूर्वी विद्यार्थ्यांच्या हातात वेळेत पुस्तके पोहोचावीत, यासाठी प्रशासनाकडून नियोजनबद्ध पद्धतीने शाळांवर पाठ्यपुस्तकांचे वितरण करण्यात येत आहे.गटशिक्षणाधिकारी श्री. विलास भाई यांनी दिलेल्या माहितीनुसार, चाळीसगाव तालुक्यासाठी आतापर्यंत 2 लाख 48 हजार 74 पाठ्यपुस्तकांच्या प्रती उपलब्ध झाल्या असून त्यांचे टप्प्याटप्प्याने वितरण सुरू आहे.
तालुक्यातील एकूण 52 हजार 757 विद्यार्थ्यांसाठी पाठ्यपुस्तकांचे नियोजन करण्यात आले आहे. त्यामध्ये मराठी माध्यमातील 32 हजार 826, सेमी-इंग्रजी माध्यमातील 17 हजार 198 आणि उर्दू माध्यमातील 2 हजार 733 विद्यार्थ्यांचा समावेश आहे.इयत्तानिहाय वितरणामध्ये पहिली ते आठवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी आवश्यक पाठ्यपुस्तके उपलब्ध करून देण्यात येत असून, प्रत्येक माध्यमातील विद्यार्थ्यांच्या संख्येनुसार पुस्तकांचे नियोजन करण्यात आले आहे.
त्यामुळे शाळा सुरू होताच विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी आवश्यक साहित्य सहज उपलब्ध होणार आहे.दरम्यान, नालंदा माध्यमिक विद्यालय येथे पाठ्यपुस्तक वितरणाचे काम शिक्षण विस्ताराधिकारी श्री. संजय नाहीदे यांच्या सनियंत्रणाखाली सुरू असून, केंद्रस्तरीय विशेष शिक्षक पंकज रणदिवे, प्रशांत पाटील, रवींद्र पाटील, राजेंद्र चौधरी, निलेश पाटील, विजय कदम, निंबा परदेशी, रमेश वाघ, शामकांत नेरकर तसेच विषयतज्ञ वीरेंद्र पाटील व नरेंद्र महाजन हे वितरण प्रक्रियेत सक्रिय सहभाग घेत आहेत.
शैक्षणिक वर्षाच्या सुरुवातीलाच विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तके उपलब्ध करून देण्याच्या या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांसह पालकांनाही मोठा दिलासा मिळाला असून, शिक्षण विभागाच्या नियोजनबद्ध कार्यपद्धतीचे स्वागत केले जात आहे.
