अधिकार आमचा न्युज नेटवर्क
संपादक गफ्फार शेख (मलिक)
उपसंपादक रोहित शिंदे
जळगाव(प्रतिनिधी)- रस्ता सुरक्षा अभियानांतर्गत जळगाव शहर वाहतूक शाखेकडून नियमभंग करणाऱ्या वाहनचालकांवर कडक कारवाई करण्यात येत आहे. सन २०२६ मध्ये राबविण्यात आलेल्या मोहिमेदरम्यान वाहतूक पोलिसांनी तपासणी करताना सुमारे १०० दुचाकींवर बसविण्यात आलेले कर्कश आवाज करणारे सायलेन्सर आढळून आले. हे सायलेन्सर संबंधित कंपनीकडून बसविण्यात आलेले नसून वाहन खरेदी केल्यानंतर बाहेरून बसविण्यात आल्याचे निदर्शनास आले. या कर्कश आवाजामुळे स्थानिक रहिवासी, जेष्ठ नागरिक व शाळकरी विद्यार्थ्यांना त्रास होत असल्याने संबंधित सायलेन्सर जप्त करण्यात आले.
याशिवाय शहरात अवैधरित्या फॅन्सी नंबर प्लेट लावून फिरणाऱ्या वाहनांवरही कारवाई करण्यात आली असून २५० नंबर प्लेट ताब्यात घेण्यात आल्या होत्या. आज (दि २४) पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांच्या आदेशान्वये जप्त करण्यात आलेले सायलेन्सर व फॅन्सी नंबर प्लेट रोड रोलरच्या सहाय्याने चेपून निकामी करण्यात आले.
दरम्यान, जळगाव जिल्ह्यातील रस्ते अपघातांच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी अधिक कठोर पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. सन २०२५ मध्ये जिल्ह्यात एकूण ९३९ अपघात घडले असून त्यापैकी ४५० अपघात प्राणांतिक ठरले. या अपघातांत सुमारे ४८७ जणांचा मृत्यू झाला आहे.
या पार्श्वभूमीवर मोटार वाहन कायद्यान्वये विना हेल्मेट वाहन चालविणे, ट्रिपल सीट, अल्पवयीन वाहनचालक, रॅश ड्रायव्हिंग, नो-पार्किंग, अवैध प्रवासी वाहतूक, दारू पिऊन वाहन चालविणे, राँग साईडने वाहन चालविणे, वाहन चालविताना मोबाईलचा वापर तसेच कर्कश सायलेन्सर अशा विविध नियमभंगांवर कारवाई करण्यासाठी विशेष पथके नियुक्त करण्यात आली आहेत.
पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांच्या मार्गदर्शनाखाली ही मोहीम पुढेही अधिक तीव्र करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले आहे. नागरिकांनी वाहतूक नियमांचे पालन करून कारवाई टाळावी, असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे.
तसेच जळगाव जिल्हा ‘शून्य प्राणहानी’ जिल्हा करण्याच्या उद्देशाने रस्ता सुरक्षा समिती स्थापन करण्यात आली असून जनजागृती व कठोर कारवाईच्या माध्यमातून अपघातांचे प्रमाण कमी करण्यावर भर दिला जात आहे.
