अधिकार आमचा न्युज नेटवर्क
संपादक गफ्फार शेख (मलिक)
उपसंपादक रोहित शिंदे
जळगाव (प्रतिनिधी) : जिल्ह्यात बेकायदेशीर अग्निशस्त्रांच्या वापरातून दहशत निर्माण करण्याच्या घटनांच्या पार्श्वभूमीवर स्थानिक गुन्हे शाखा (LCB) जळगावने मोठी कारवाई करत दोन संशयित आरोपींना अटक केली आहे. त्यांच्या ताब्यातून गावठी पिस्तूल, जिवंत काडतुसे व अन्य मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.मा. पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांनी दिलेल्या सूचनेनुसार बेकायदेशीर शस्त्र बाळगणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले होते.
त्या अनुषंगाने वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड यांना गोपनीय माहिती मिळाली की, उमर्टी गावाकडून कृष्णापूर–मामलदे मार्गे चोपड्याकडे दोन इसम मोटारसायकलवरून गावठी पिस्तूल घेऊन येत आहेत.माहितीची खातरजमा करून पोलिसांनी उमर्टी परिसरात सापळा रचला. संशयित हिरो होंडा मोटारसायकल (क्र. MH-19-S-9450) थांबवून त्यावरील दोघांना ताब्यात घेण्यात आले. चौकशीत त्यांनी आपली नावे राहुल कुवरसिंग पावरा (वय २२, रा. उमर्टी, ता. चोपडा) व गणपत प्रभाकर किर्तने (वय २८, रा. असोला, ता. औंढा नागनाथ, जि. हिंगोली) अशी सांगितली.पंचांसमक्ष अंगझडती घेतली असता आरोपींकडून १ गावठी पिस्तूल, ५ जिवंत काडतुसे, हिरो होंडा मोटारसायकल व २ मोबाईल फोन असा सुमारे ६९ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
या प्रकरणी चोपडा ग्रामीण पोलीस ठाण्यात गु.र.नं. ५९/२०२६ अन्वये शस्त्र अधिनियम कलम ३/२५ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.ही कारवाई पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधीक्षक कविता नेरकर, उपविभागीय पोलीस अधिकारी आण्णासाहेब घोलप यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली पोलीस उपनिरीक्षक जितेंद्र वल्टे, पोलीस हवालदार विष्णू बिहराडे, दीपक माळी, रवींद्र पाटील, विलास सोनवणे व पोलीस अंमलदार रावसाहेब पाटील यांच्या पथकाने यशस्वीरीत्या पार पाडली.
