प्रतिकात्मक चित्र
अधिकार आमचा न्युज नेटवर्क
संपादक गफ्फार शेख (मलिक)
उपसंपादक रोहित शिंदे
चाळीसगाव (प्रतिनिधी) : तालुक्यातील करगाव येथील शेतकरी महारू वामन मुलमुले (वय 50) यांच्या शेळीपालन शेडमध्ये अज्ञात चोरट्यांनी शेडचे कुलूप तोडून ७ बकऱ्यांची चोरी केल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी मुलमुले यांनी ग्रामीण पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे.
मुलमुले हे पत्नी मीराबाई व कुटुंबीयांसह शेती व शेळीपालन करून उदरनिर्वाह करतात. करगाव गावाजवळील वडगाव रोडलगत त्यांचे शेळीपालन शेड आहे. दिनांक 18 एप्रिल रोजी सायंकाळी सुमारे 5 वाजता त्यांनी नेहमीप्रमाणे 25 बकऱ्या शेडमध्ये ठेवून कुलूप लावले होते. मात्र 19 एप्रिल रोजी सकाळी 6 वाजता ते शेडवर गेले असता कुलूप तोडलेले आढळून आले.
गावात चौकशी केली असता काही ग्रामस्थांनी रात्री सुमारे 2.30 वाजता एक पिकअप बोलेरो गाडी संशयास्पदरीत्या जाताना पाहिल्याचे सांगितले. त्यावरून अज्ञात चोरट्यांनी शेड फोडून 7 बकऱ्या चोरून नेल्याची खात्री झाली.
चोरीस गेलेल्या बकऱ्यांमध्ये काळी, तपकिरी, पांढरी तसेच भुरकट रंगाच्या विविध वैशिष्ट्यांच्या बकऱ्यांचा समावेश असून त्यांची एकूण अंदाजे किंमत 35 हजार रुपये आहे.
या घटनेमुळे परिसरातील शेतकरी व पशुपालकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. ग्रामीण पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू केला आहे.
