अधिकार आमचा न्युज नेटवर्क
संपादक गफ्फार शेख (मलिक)
उपसंपादक रोहित शिंदे
जळगाव(प्रतिनिधी)-जळगाव-पाळधी मार्गावर चाकूचा धाक दाखवून युवकांना मारहाण करत रोख रक्कम लुटणाऱ्या चार अट्टल गुन्हेगारांना जळगाव तालुका पोलिसांनी अवघ्या दोन तासांत जेरबंद करत धडक कारवाई केली आहे. पोलिसांच्या या तातडीच्या कारवाईमुळे नागरिकांमध्ये समाधान व्यक्त होत असून गुन्हेगारांमध्येही चांगलीच दहशत निर्माण झाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, दिनांक ११ जून २०२६ रोजी पहाटे १.३० ते ३.४५ वाजेच्या दरम्यान फिर्यादी चेतन प्रकाश पाटील (वय ३५, रा. खोटे नगर, जळगाव) हे आपल्या मित्रांसह मोटारसायकलवरून जळगाव-पाळधी रोडने जात असताना हॉटेल साई गार्डन व हॉटेल राधिका परिसरात चार आरोपींनी त्यांची मोटारसायकल अडवली. आरोपींनी चाकूचा धाक दाखवत फिर्यादी व त्यांच्या मित्रांना चापट-बुक्क्यांनी मारहाण केली, शिवीगाळ व दमदाटी करत त्यांच्या खिशातील सुमारे ७ हजार ८०० रुपये रोख रक्कम हिसकावून घेतली. यानंतर मोटारसायकलची तोडफोड करून आरोपी घटनास्थळावरून पसार झाले.
या प्रकरणी जळगाव तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक १७८/२०२६ अंतर्गत भारतीय न्याय संहिता (BNS) मधील विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला.
घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस निरीक्षक शशिकांत पाटील यांनी डीबी पथकाला तात्काळ रवाना केले. गुप्त माहिती आणि तांत्रिक तपासाच्या आधारे पोलिसांनी अवघ्या दोन तासांच्या आत चारही आरोपींना अटक करण्यात यश मिळवले.
अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये चेतन उर्फ बटाटा रमेश सुशीर (वय २१), उमाकांत दत्तात्रेय जाधव, गौरव संजय जाधव (वय २१) आणि रोशन भगवान पाटील (वय २६) यांचा समावेश आहे. यापैकी काही आरोपी हे सराईत गुन्हेगार असून त्यांच्यावर यापूर्वीही गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक श्रीकांत धीवरे, अप्पर पोलीस अधीक्षक संदीप गावीत, उपविभागीय पोलीस अधिकारी नितीन गणापुरे आणि पोलीस निरीक्षक शशिकांत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली डीबी पथकाने केली. यामध्ये पोलीस कर्मचारी सुनील पाटील, योगेश पाटील, विनाश देवरे, कैलास इंगळे, प्रविण कोळी, दीपक देवरे, किरण पाटील तसेच वाहन चालक पंकज देशमुख यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक शामकुमार मोरे करीत आहेत.
