अधिकार आमचा न्युज नेटवर्क
संपादक गफ्फार शेख (मलिक)
उपसंपादक रोहित शिंदे
चाळीसगाव (प्रतिनिधी) – नवीन शैक्षणिक वर्षाच्या पहिल्याच दिवशी चाळीसगाव ग्रामीण पोलिस स्टेशनच्या वतीने परिसरातील विविध शाळा व महाविद्यालयांना भेट देऊन विद्यार्थी व विद्यार्थिनींमध्ये जनजागृती करण्यात आली. यावेळी ‘पोलीस काका’ व ‘पोलीस दीदी’ या उपक्रमांतर्गत विद्यार्थ्यांना पोलिसांकडून मिळणाऱ्या विविध मदतीची सविस्तर माहिती देण्यात आली.
पोलिस अधिकाऱ्यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधत महिला सुरक्षा, बाल सुरक्षा, सायबर गुन्ह्यांपासून संरक्षण, मार्गदर्शन व समुपदेशन तसेच आपत्कालीन परिस्थितीत त्वरित मदत कशी मिळवावी याबाबत मार्गदर्शन केले. कोणत्याही अडचणीच्या प्रसंगी पोलिसांशी निःसंकोच संपर्क साधावा, असा संदेशही विद्यार्थ्यांना देण्यात आला.
यावेळी “आम्ही सदैव तुमच्या पाठीशी आहोत” हा विश्वास विद्यार्थ्यांमध्ये निर्माण करण्याचा प्रयत्न करण्यात आला. शाळेच्या पहिल्या दिवशी पोलिसांनी घेतलेल्या या जनजागृती उपक्रमाचे शिक्षक, पालक आणि विद्यार्थ्यांकडून स्वागत करण्यात आले.
“आपली सुरक्षा – आमची जबाबदारी” या ब्रीदवाक्याला साजेशा या उपक्रमातून विद्यार्थी आणि पोलिस यांच्यात विश्वासाचे नाते अधिक दृढ करण्याचा प्रयत्न चाळीसगाव ग्रामीण पोलिसांनी केला.
