अधिकार आमचा न्युज नेटवर्क
संपादक गफ्फार शेख (मलिक)
उपसंपादक रोहित शिंदे
चाळीसगाव(प्रतिनिधी)- चाळीसगावचे तहसीलदार प्रशांत पाटील यांनी सोमवारी (दि. 15 जून 2026) पहाटे भडगाव रोडवरील खरजई नाका परिसरात धडक कारवाई करत अवैध वाळू वाहतूक करणारे डंपर पकडत कारवाई केली मात्र असे अनेक डंपर रात्री गस्तीवर असलेल्या पथकांच्या हाती का येत नाही असा सवाल उपस्थित झाला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, सकाळी 5 ते 5.30 वाजेच्या दरम्यान भडगावकडून चाळीसगाव शहराच्या दिशेने येणाऱ्या वाळूने भरलेल्या विना नंबर प्लेट डंपर तहसीलदार प्रशांत पाटील यांनी थांबवत कागदपत्रांची विचारपूस करून ताब्यात घेतले. त्यानंतर महसूल विभागातील तलाठी विनोद मेन व तलाठी चेतन ठाकूर यांना घटनास्थळी बोलावून पुढील कारवाई करण्यात आली.मात्र खरजई नाक्यावर महसूल विभागाचे पथक नियुक्त असतानाही कारवाईच्या वेळी संबंधित पथक घटनास्थळी उपस्थित नसल्याची चर्चा परिसरात सुरू आहे. त्यामुळे रात्रभर अवैध वाळू वाहतूक सुरू असताना रात्रगस्त साठी नियुक्त पथक नेमके काय करत होते जी कारवाई तहसीलदारांनी केली अशी कारवाई पथकांकडून का होत नाही? अशी अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहे.
या कारवाईमुळे अवैध वाळू वाहतूक करणाऱ्यांमध्ये खळबळ उडाली असून, महसूल विभागाकडून तहसीलदारांच्या देखरेखीत पुढेही अशाच प्रकारच्या अचानक कारवाया सुरू राहिल्या पाहिजे अशी अपेक्षा जनसामान्यांकडून व्यक्त केली जात आहे.तसेच खरजई नाका येथे नियुक्त पथकाच्या कार्यपद्धतीची चौकशी झाली पाहिजे म्हणजे नेमकं त्यांना अवैध वाळूचे डंपर का सापडत नाही हे समोर येईल.
