अधिकार आमचा न्युज नेटवर्क
संपादक गफ्फार शेख (मलिक)
उपसंपादक रोहित शिंदे
चाळीसगाव(प्रतिनिधी)-खासदार संजय दिना पाटील यांनी पत्रकारांविषयी केलेल्या कथित अपमानास्पद वक्तव्याच्या निषेधार्थ व्हॉईस ऑफ मीडिया (VOM) इंटरनॅशनल फोरमने आक्रमक भूमिका घेत चाळीसगाव शहर पोलीस ठाण्याचे पोलिस निरीक्षक अमितकुमार मानेळ यांना दिनांक २६ जून रोजी निवेदन सादर केले. पत्रकारांचा अवमान हा संपूर्ण पत्रकारिता क्षेत्राचा अपमान असून, या प्रकरणात तातडीने कारवाई करण्याची मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली.
निवेदनात म्हटले आहे की, लोकप्रतिनिधींनी पत्रकारांविषयी अवमानकारक भाषा वापरणे ही गंभीर बाब असून त्यामुळे समाजात चुकीचा संदेश जातो. अशा विधानांमुळे पत्रकारांवर दबाव निर्माण होण्याबरोबरच त्यांच्या सुरक्षिततेलाही धोका निर्माण होतो. लोकशाहीत माध्यमांचा सन्मान राखणे ही प्रत्येक लोकप्रतिनिधीची जबाबदारी असल्याचेही नमूद करण्यात आले आहे.
व्हॉईस ऑफ मीडियाने खासदार संजय दिना पाटील यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची, पत्रकारांची जाहीर व लेखी बिनशर्त माफी मागण्याची, त्यांच्या वर्तनाची चौकशी करून कठोर कारवाई करण्याची तसेच पत्रकारांचा अवमान करणाऱ्यांविरुद्ध शासनाने कठोर धोरण जाहीर करण्याची मागणी केली आहे. राज्यातील पत्रकारांना सुरक्षित वातावरणात काम करता यावे यासाठी पत्रकार संरक्षणाच्या उपाययोजना प्रभावीपणे राबविण्याचीही मागणी करण्यात आली.
याशिवाय, या प्रकरणात न्याय मिळेपर्यंत खासदार संजय दिना पाटील व शिंदे गटाच्या पत्रकार परिषदांवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय जाहीर करण्यात आला. शासनाने तातडीने योग्य कारवाई न केल्यास राज्यभर लोकशाही मार्गाने तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही संघटनेने दिला आहे.
यावेळी निवेदन देतांना यावेळी व्हॉईस ऑफ मीडिया आंतरराष्ट्रीय पत्रकार संघटनेचे जळगाव जिल्हाध्यक्ष कल्पेश महाले, शहराध्यक्ष गफार शेख, शहर उपाध्यक्ष रवींद्र कोष्टी, शहर कार्याध्यक्ष महेंद्र महाले, शहर संघटक रणधीर जाधव,शहर सल्लागार आनंद गांगुर्डे, तालुका उपाध्यक्ष राकेश निकम, तालुका कार्याध्यक्ष अजगर मुल्ला, तालुका सचिव वैभव वाघ, सदस्य खेमचंद कुमावत, रोहित शिंदे उपस्थित होते.
