अधिकार आमचा न्युज नेटवर्क
संपादक गफ्फार शेख (मलिक)
उपसंपादक रोहित शिंदे
चाळीसगाव (प्रतिनिधी) : तालुक्यातील तळेगाव येथील शेतातून चोरीस गेलेली जलपरी मोटार अवघ्या काही दिवसांत शोधून काढत चाळीसगाव ग्रामीण पोलिसांनी दोन आरोपींना अटक केली आहे. आरोपींकडून चोरीस गेलेली सुमारे ५,२०० रुपये किंमतीची मोटार जप्त करण्यात आली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, फिर्यादी महेश अर्जुन चोरमले (वय ४०, रा. तळेगाव) यांच्या शेतात साक्षीदार गोरख निंबा मोरे यांच्या मालकीची Ecozen कंपनीची ५ एचपीची जलपरी मोटार ठेवलेली होती. ही मोटार १७ जून २०२६ रोजी सायंकाळी ५ वाजेपासून ते १९ जून २०२६ रोजी सकाळी ८ वाजेच्या दरम्यान तळेगाव शिवारातील गट क्रमांक २३१/१ मधील शेडजवळून अज्ञात चोरट्याने चोरून नेली होती.
याप्रकरणी चाळीसगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक २०१/२०२६, भारतीय न्याय संहिता (BNS) कलम ३०३(२) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता.
पोलीस अधीक्षक श्रीकांत ढिवरे, अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते आणि उपविभागीय पोलीस अधिकारी विजयकुमार ठाकूरवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अमित मनेळ यांनी तपासाची सूत्रे हाती घेतली. तपासादरम्यान पोलिसांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे राकेश उर्फ विक्की रामलाल मोरे (वय २५) आणि सोनगिर उर्फ शंभू हिरागीर गोसावी (वय ३३), दोघेही रा. तळेगाव यांना ताब्यात घेण्यात आले.चौकशीदरम्यान दोन्ही आरोपींनी चोरीची कबुली दिली. त्यानंतर पोलिसांनी चोरीस गेलेली जलपरी मोटार पंचनाम्यानुसार जप्त केली.
ही कारवाई पोलीस निरीक्षक अमित मनेळ यांच्या नेतृत्वाखाली पोलीस उपनिरीक्षक कुणाल चव्हाण, सफौ. युवराज नाईक, पोहेकॉ. तुकाराम चव्हाण, पोहेकॉ. गणेश चव्हाण, पोकॉ. ज्ञानेश्वर वाघ आदींच्या पथकाने केली. या प्रकरणाचा पुढील तपास पोहेकॉ. गणेश चव्हाण करीत आहेत.
