अधिकार आमचा न्युज नेटवर्क
संपादक गफ्फार शेख (मलिक)
उपसंपादक रोहित शिंदे
चाळीसगाव (प्रतिनिधी) – तालुक्यातील बिलाखेड गावाजवळ मेंढी फॉर्मच्या मागील परिसरात अवैधरित्या जेसीबी व पोकलँड मशीनच्या सहाय्याने मोठ्या प्रमाणावर उत्खनन केले जात असून डंपर व ट्रॅक्टर ट्रॉलीद्वारे गौण खनिजाची वाहतूकही सर्रास सुरू असल्याचे स्पष्ट झाले आहे.
अवैध रित्या सुरू असलेल्या उत्खननाच्या ठिकाणी मोठमोठे खड्डे पडले असून त्यामुळे पर्यावरणीय हानी होत असून पर्यावरणाला धोका निर्माण झाला आहे. विशेष म्हणजे, दिवसा देखील डंपरद्वारे वाहतूक सुरू असल्याचे दिसून येत असल्याने या प्रकाराकडे संबंधित विभागाचे दुर्लक्ष होत असल्याची चर्चा आहे.
याबाबत बिलाखेड येथील तलाठी यांच्याशी संपर्क साधला असता, अशा प्रकारच्या उत्खननाची कोणतीही माहिती नसल्याचे त्यांनी सांगितले मात्र गावातील मुख्य रस्त्यावरून होत असलेली अवैध गौण खनिजाची दिवसा होणारी वाहतूक जर दिसत नसेल तर प्रकार गंभीर आहे.
महसूल प्रशासनाला याची माहिती नसताना एवढ्या मोठ्या प्रमाणावर उत्खनन आणि वाहतूक कशी सुरू आहे, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे? परिसरात आता एकच चर्चा सुरू आहे की, हे अवैध उत्खनन आणि वाहतूक नेमकी कोणाच्या आशीर्वादाने सुरू आहे? संबंधित यंत्रणांनी तात्काळ घटनास्थळी पाहणी करून पर्यावरणाची हानी सह शासनाचा महसूल बुडवत सुरू असलेल्या या उत्खननांची चौकशी करावी आणि या नियमबाह्य उत्खनन बंद करून कठोर कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.
