अधिकार आमचा न्युज नेटवर्क
संपादक गफ्फार शेख (मलिक)
उपसंपादक रोहित शिंदे
चाळीसगाव (प्रतिनिधी) : शहरातील पोस्ट ऑफिसमध्ये पैसे जमा करण्यासाठी आलेल्या एका महिलेच्या पिशवीतून ५० हजार रुपयांची रोकड चोरी झाल्याची घटना बुधवारी (दि. २४) सकाळी घडली. याप्रकरणी चाळीसगाव शहर पोलिस ठाण्यात दोन अज्ञात महिलांविरुद्ध चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, स्टेशन परिसरात राहणाऱ्या रेहाना बी शफयुद्दीन शेख या मजुरी करून उदरनिर्वाह करतात. त्या बुधवारी सकाळी सुमारे ११ वाजता पोस्ट ऑफिसमध्ये पैसे जमा करण्यासाठी गेल्या होत्या. त्यांच्या कापडी पिशवीत ५० हजार रुपयांचे दोन बंडल ठेवले होते.
पैसे भरण्यासाठी काउंटरवर गेल्यानंतर पिशवी तपासली असता त्यामध्ये केवळ ५० हजार रुपये शिल्लक असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. तसेच पिशवीच्या खालच्या बाजूला ब्लेडने कापल्याचे आढळून आले. त्यामुळे अज्ञात चोरट्यांनी पिशवीतील ५० हजार रुपयांची रोकड लंपास केल्याचे स्पष्ट झाले.
घटनेची माहिती पोस्ट कार्यालयातील कर्मचाऱ्यांना देण्यात आल्यानंतर सीसीटीव्ही फुटेजची तपासणी करण्यात आली. त्यामध्ये दोन अज्ञात महिला संशयितरित्या वावरताना दिसून आल्या. त्यांचा परिसरात शोध घेण्यात आला, मात्र त्या आढळून आल्या नाहीत.
याप्रकरणी रेहाना बी शफयुद्दीन शेख यांनी दिलेल्या फिर्यादीवरून चाळीसगाव शहर पोलिस ठाण्यात दोन अज्ञात महिलांविरुद्ध चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल नितीन आगोने करीत आहेत.
