अधिकार आमचा न्युज नेटवर्क
संपादक गफ्फार शेख (मलिक)
उपसंपादक रोहित शिंदे
जळगाव(प्रतिनिधी)-जळगाव तालुका पोलीस स्टेशन हद्दीत गेल्या काही दिवसांपासून वाढलेल्या घरफोडीच्या घटनांना आळा घालत जळगाव तालुका पोलिसांनी मोठी कारवाई करत १० गुन्ह्यांची उकल केली आहे. या कारवाईत ५ अट्टल आरोपींना अटक करण्यात आली असून त्यांच्याकडून तब्बल ४ लाख ३० हजार रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.
घरफोडीच्या वाढत्या घटनांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. या पार्श्वभूमीवर पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी जळगाव तालुका पोलीस स्टेशनला गुन्ह्यांचा तातडीने छडा लावण्याच्या सूचना दिल्या. त्यानुसार पोलीस निरीक्षक शशिकांत पाटील यांनी विशेष पथके तयार करून गुप्त माहिती संकलन, तांत्रिक विश्लेषण, सीसीटीव्ही फुटेज तपासणी तसेच संशयितांवर पाळत ठेवण्याचे आदेश दिले.
गुन्हा रजि. क्र. ६७/२०२६ (BNS कलम ३०५(अ), ३३१(४)) च्या तपासादरम्यान गुन्हे शोध पथकाला गुप्त माहिती व तांत्रिक विश्लेषणातून महत्त्वाचे धागेदोरे मिळाले. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून गुरुजीत सिंग सुजानसिंग बावरी (२६), दीपक बापू पाटील (२३), राजेश माणिक राठोड (२४), सुमित संजय कोळी (१९) आणि महेश उर्फ संतोष भोई (२४) या पाच आरोपींना अटक केली.
कसून चौकशीत आरोपींनी ९ घरफोडी आणि १ मोटार वाहन चोरी, असे एकूण १० गुन्हे केल्याची कबुली दिली. त्यांच्या ताब्यातून घरफोडीतील २ लाख ३० हजार रुपयांचा ऐवज तसेच २ लाख रुपये किमतीच्या चार मोटारसायकली असा एकूण ४ लाख ३० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
तपासात मुख्य आरोपी गुरुजीतसिंग बावरी हा सराईत गुन्हेगार असल्याचे निष्पन्न झाले. त्याच्याविरुद्ध एमआयडीसी पोलीस ठाण्यात ११, जिल्हापेठ पोलीस ठाण्यात १ आणि जळगाव तालुका पोलीस ठाण्यात १ असे एकूण १३ गंभीर गुन्हे दाखल आहेत. त्याच्यावर यापूर्वी एमपीडीए (MPDA) अंतर्गत कारवाई करून एक वर्षासाठी नागपूर मध्यवर्ती कारागृहात स्थानबद्ध करण्यात आले होते. कारागृहातून सुटल्यानंतर त्याने पुन्हा घरफोडीचे गुन्हे सुरू केले होते. मात्र, जळगाव तालुका पोलिसांनी कौशल्यपूर्ण तपास करून संपूर्ण टोळीला जेरबंद करण्यात यश मिळविले.
ही उल्लेखनीय कारवाई पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक संदीप गावीत आणि उपविभागीय पोलीस अधिकारी नितीन गणापुरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक शशिकांत पाटील, सहाय्यक पोलीस निरीक्षक नयन पाटील, पोलीस उपनिरीक्षक विजय पाटील, प्रोबेशनरी पोलीस उपनिरीक्षक यज्ञजीता येडले तसेच गुन्हे शोध पथकातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी यशस्वीरीत्या पार पाडली.
