अधिकार आमचा न्युज नेटवर्क
संपादक गफ्फार शेख (मलिक)
उपसंपादक रोहित शिंदे
चाळीसगाव(प्रतिनिधी)-शहर पोलिसांनी अवैध गुटखा तस्करीविरोधात मोठी कारवाई करत महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधित केलेला गुटखा, सुगंधित पानमसाला, सुगंधित तंबाखू तसेच वाहतुकीसाठी वापरण्यात आलेली कार असा एकूण ६ लाख ५७ हजार ७८ रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. या प्रकरणी पाच आरोपींना ताब्यात घेण्यात आले असून त्यांच्याविरुद्ध चाळीसगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
जळगाव जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्री. श्रीकांत धिवरे यांनी जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाण्यांना अवैध धंद्यांविरोधात कठोर कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार चाळीसगाव शहर पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी पोलीस निरीक्षक अमितकुमार मनेळ यांना ८ जुलै रोजी गोपनीय माहिती मिळाली की, हनुमानवाडी परिसर, बलभीम व्यायामशाळेजवळ, आनंदवाडीतील जुना डिझेल गॅरेज परिसर तसेच बसस्थानकामागील लक्ष्मीनगर येथे काही जण प्रतिबंधित गुटखा व पानमसाल्याची अवैधरित्या वाहतूक व विक्री करीत आहेत.माहितीची खातरजमा करून पोलिसांनी विशेष पथक तयार करत गोपनीय सापळा रचला. कारवाईदरम्यान अजित चांदूमल रावलानी, कुबेर शेखर कदम, हितेश किशोर पवार, निखिल राजेंद्र केसरवाणी आणि सौरभ संजय शिंगणे (सर्व रा. चाळीसगाव) यांना ताब्यात घेण्यात आले.
आरोपींकडील ट्रॅव्हल बॅगची तपासणी केली असता त्यामध्ये महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधित केलेला गुटखा, सुगंधित पानमसाला व सुगंधित तंबाखू मोठ्या प्रमाणात आढळून आला. त्यानंतर अन्न व औषध प्रशासन विभागाच्या अधिकाऱ्यांना घटनास्थळी बोलावून पंचनामा करण्यात आला.
अन्न व औषध प्रशासन विभागाच्या फिर्यादीवरून चाळीसगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक ३३३/२०२६ दाखल करण्यात आला असून भारतीय न्याय संहिता (BNS) कलम १२३, २२३, २४७, २७५ तसेच अन्न सुरक्षा व मानके अधिनियम कलम २६(२)(i), २६(२)(iv) आदी कलमांनुसार गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
या कारवाईत प्रतिबंधित गुटखा, पानमसाला, सुगंधित तंबाखू तसेच वाहतुकीसाठी वापरण्यात आलेली टाटा इंडिका (क्र. MH-18-W-7837) असा एकूण ६,५७,०७८ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
प्राथमिक तपासात हा प्रतिबंधित माल बऱ्हाणपूर (मध्य प्रदेश) येथून तस्करी करून चाळीसगावात आणण्यात आल्याचे निष्पन्न झाले असून या रॅकेटमधील इतर संबंधितांचा शोध पोलीस घेत आहेत. पुढील तपास चाळीसगाव शहर पोलीस करीत आहेत.
ही कारवाई पोलीस अधीक्षक श्री. श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक श्री. अशोक नखाते आणि उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. विजयकुमार ठाकूरवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अमितकुमार मनेळ, पोलीस उपनिरीक्षक संदीप घुले, पोलीस कॉन्स्टेबल मोहन सूर्यवंशी, अशोक मोरे व कल्पेश पगारे यांच्या पथकाने केली.
पोलीस अधीक्षक श्री. श्रीकांत धिवरे यांनी नागरिकांना आवाहन केले आहे की, प्रतिबंधित गुटखा, पानमसाला व तत्सम तंबाखूजन्य पदार्थांची खरेदी-विक्री, साठवणूक किंवा वाहतूक करणे हा कायद्याने गुन्हा आहे. अशा अवैध व्यवसायांची माहिती तात्काळ पोलिसांना द्यावी. माहिती देणाऱ्याची ओळख गोपनीय ठेवली जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले.
