अधिकार आमचा न्युज नेटवर्क
संपादक गफ्फार शेख (मलिक)
उपसंपादक रोहित शिंदे
जळगाव(प्रतिनिधी)-शहरात अंमली पदार्थांच्या अवैध विक्री व तस्करीविरोधात स्थानिक गुन्हे शाखा (एलसीबी) आणि जिल्हापेठ पोलीस स्टेशन यांच्या संयुक्त पथकाने मोठी कारवाई करत ५६.२९ ग्रॅम मेफेड्रोन (एमडी) हा अंमली पदार्थ जप्त केला. या कारवाईत दोन आरोपींना अटक करण्यात आली असून, ३ लाख ६ हजार ५४० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी “नशामुक्त भारत” अभियानांतर्गत जिल्ह्यात अंमली पदार्थांविरोधात कठोर कारवाई करण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पथकाने ही धडक कारवाई केली.
१० जुलै २०२६ रोजी पहाटे २.३५ वाजता गुप्त माहितीच्या आधारे छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यामागील शासकीय तांत्रिक विद्यालयाशेजारील जी.एस. ग्राऊंड प्रवेशद्वार परिसरात सापळा रचण्यात आला. यावेळी मोटारसायकलवरून आलेल्या तिघांना अडविण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र, त्यापैकी एक जण अंधाराचा फायदा घेत पसार झाला, तर उर्वरित दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतले.
झडतीदरम्यान आरोपींकडून ५६.२९ ग्रॅम वजनाचा सुमारे २ लाख ८१ हजार ५४० रुपये किमतीचा मेफेड्रोन (एमडी) हा अंमली पदार्थ जप्त करण्यात आला. तसेच २५ हजार रुपये किमतीची हिरो स्प्लेंडर (एमएच-१९-डीजे-०१३२) मोटारसायकलही जप्त करण्यात आली. एकूण ३ लाख ६ हजार ५४० रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी ताब्यात घेतला.
या प्रकरणी जयेश देविदास तायडे (वय २७, रा. हरीओम नगर, मोहन टॉकीजजवळ, जळगाव) व हितेंद्र शिवाजी परदेशी (वय ३१, रा. कांचन नगर, जळगाव) यांना अटक करण्यात आली आहे. प्राथमिक चौकशीत दोघांनी फरार आरोपी भैय्या सोनवणे (रा. कांचन नगर, जळगाव) याच्याकडून विक्रीसाठी मेफेड्रोन घेतल्याची कबुली दिली असून, त्याचा शोध सुरू आहे.
आरोपी जयेश तायडे याच्याविरुद्ध यापूर्वी खुनाचा प्रयत्न, सरकारी कर्मचाऱ्यावर हल्ला, गंभीर दुखापत आणि दरोडा अशा स्वरूपाचे चार गुन्हे विविध पोलीस ठाण्यांत दाखल असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
या प्रकरणी जिल्हापेठ पोलीस ठाण्यात एनडीपीएस कायदा १९८५ अंतर्गत कलम ८(क), २२(क) व २९ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक संदीप गावीत आणि उपविभागीय पोलीस अधिकारी नितीन गणापुरे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड यांच्या नेतृत्वातील स्थानिक गुन्हे शाखा व जिल्हापेठ पोलीसांच्या संयुक्त पथकाने यशस्वीरीत्या पार पाडली.
