अधिकार आमचा न्युज नेटवर्क
संपादक गफ्फार शेख (मलिक)
उपसंपादक रोहित शिंदे
चाळीसगाव (प्रतिनिधी): अल्पसंख्याक विकास मंडळाचे संस्थापक तथा प्रदेशाध्यक्ष शोएब खाटीक यांच्या अध्यक्षतेखाली धुळे येथे उत्तर महाराष्ट्रातील पदाधिकाऱ्यांची महत्त्वपूर्ण बैठक उत्साहात पार पडली. या बैठकीला नाशिक, धुळे, नंदुरबार आणि जळगाव जिल्ह्यांतील पदाधिकाऱ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला.
बैठकीस प्रदेश उपाध्यक्ष साजिद पिंजारी, महाराष्ट्र प्रदेश महासचिव अमीनोद्दीन शेख तसेच प्रदेश संयुक्त सचिव मन्नान सिकलीकर यांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी मार्गदर्शन करताना प्रदेशाध्यक्ष शोएब खाटीक यांनी संघटना अधिक सक्षम, सक्रिय व प्रभावी करण्यासाठी प्रत्येक गाव, तालुका आणि जिल्हास्तरावर विस्तार करण्याची गरज अधोरेखित केली. अल्पसंख्याक समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी शिक्षण, रोजगार, सामाजिक उत्थान आणि संघटनात्मक बळकटी यावर विशेष भर देण्याचे आवाहन त्यांनी केले.
बैठकीत संघटनात्मक विस्ताराच्या पार्श्वभूमीवर विविध पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्याही जाहीर करण्यात आल्या. त्यानुसार शरीफ खाटीक यांची नाशिक जिल्हाध्यक्ष, अजहर सैय्यद यांची धुळे जिल्हाध्यक्ष, मुराद पटेल यांची जळगाव जिल्हाध्यक्ष, साजिद शेख यांची मालेगाव महानगराध्यक्ष तसेच आवेश शेख यांची धुळे महानगराध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली.
संघटना विस्तार अभियानांतर्गत मोठ्या संख्येने नवीन कार्यकर्ते व समाजसेवकांनी अल्पसंख्याक विकास मंडळाचे सदस्यत्व स्वीकारून संघटनेत सहभागी होण्याची घोषणा केली. प्रदेशाध्यक्ष शोएब खाटीक यांनी नवनियुक्त पदाधिकारी व नवीन सदस्यांचे स्वागत करत समाजहित आणि संघटनेच्या बळकटीसाठी निष्ठेने कार्य करण्याचे आवाहन केले.
या बैठकीस चाळीसगाव येथून अल्पसंख्याक विकास मंडळाचे सय्यद सलीम, सय्यद जावेद, सय्यद जाकीर आणि सय्यद आरिफ उपस्थित होते. कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन धुळे जिल्हाध्यक्ष अजहर सैय्यद यांनी केले. कार्यक्रमाच्या शेवटी नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला तसेच उत्तर महाराष्ट्रात संघटना अधिक मजबूत आणि प्रभावी करण्याचा संकल्प सर्व पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला.
