अधिकार आमचा न्युज नेटवर्क
संपादक गफ्फार शेख(मलिक)
उपसंपादक रोहित शिंदे
चाळीसगाव (प्रतिनिधी) : चाळीसगाव तालुक्यातील सायगाव (आलवाडी शिवार) येथे शेतातील विहिरीत पडलेल्या उपप्रौढ (Sub-Adult) मादी बिबटाचा अखेर मृत्यू झाला. वन विभागाने दोन दिवस अथक प्रयत्न करूनही बिबटाला बाहेर काढण्यात यश आले नाही. रविवारी (१९ जुलै) विहिरीतून मृतदेह बाहेर काढून पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत शवविच्छेदन करण्यात आले.
वन विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, १८ जुलै रोजी सलीम मुल्ला यांच्या शेतातील विहिरीत भक्ष्याच्या शोधात आलेली मादी बिबट पडल्याची माहिती मिळताच वन विभागाचे पथक तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. विहीर जुनी व खोल कपारीची असल्याने बचावकार्यात अनेक अडचणी आल्या. बिबटाला बाहेर येण्यासाठी विहिरीत खाट, लाकडाचा ओंडका, शिडी आदींची व्यवस्था करण्यात आली. तसेच मोबाईल व लाईव्ह कॅमेऱ्याच्या सहाय्याने सातत्याने पाहणी करण्यात आली. मात्र, सर्व प्रयत्न निष्फळ ठरले.
१९ जुलै रोजी पुन्हा पाहणी केली असता बिबटाची कोणतीही हालचाल दिसून आली नाही. त्यानंतर आवश्यक सुरक्षिततेच्या उपाययोजना करून वन कर्मचाऱ्यांनी विहिरीत उतरून बिबटाचा मृतदेह बाहेर काढला. त्यानंतर पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. म्हेत्रे यांच्या उपस्थितीत नियमानुसार शवविच्छेदन करण्यात आले.
ही संपूर्ण कार्यवाही मुख्य वनसंरक्षक (धुळे) निनू सोमराज, उपवनसंरक्षक (जळगाव) राम धोत्रे, सहायक वनसंरक्षक अमोल पंडित, वनपरिक्षेत्र अधिकारी कोमल पिंडकुरवार तसेच मानद वन्यजीव रक्षक राजेश ठोंबरे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली.
बचाव मोहिमेत वनक्षेत्र चाळीसगावचे अधिकारी व कर्मचारी, मेहुणबारे ग्रामीण पोलिस, सायगावचे पोलिस पाटील यांनी सहकार्य केले. वनपाल सागर पाटील, वनरक्षक ललित पाटील,अजय महिरे आणि रवींद्र पवार यांनी धाडसाने विहिरीत उतरून मृत बिबट बाहेर काढण्याची महत्त्वपूर्ण जबाबदारी पार पाडली.
वन विभागाने नागरिकांना आवाहन केले आहे की, परिसरात वन्यप्राणी आढळल्यास किंवा अशा प्रकारची घटना घडल्यास गर्दी न करता तात्काळ वन विभागाला माहिती द्यावी व बचावकार्यात सहकार्य करावे.
