Oplus_16908288
(बातमीत Ai प्रतिकात्मक फोटोचा वापर केला आहे)
अधिकार आमचा न्युज नेटवर्क
संपादक गफ्फार शेख (मलिक)
उपसंपादक रोहित शिंदे
भाग १
चाळीसगाव(प्रतिनिधी)-तालुक्यातील मेहुणबारे गावाजवळ पुलाशेजारी असलेल्या वॉटर सप्लाय परिसरातून गिरणा नदीपात्रात ट्रॅक्टर-ट्रॉलींच्या सहाय्याने पुन्हा मोठ्या प्रमाणावर अवैध वाळू उपसा सुरू असल्याची चर्चा परिसरात आहे. काही दिवसांपूर्वी महसूल विभागाच्या मेहुणबारे तलाठी यांनी कारवाई करून नदीकिनारी खड्डे केले होते. मात्र त्यानंतरही संबंधित ठिकाणी पुन्हा वाळू उपसा सुरू झाल्याचा आरोप स्थानिकांकडून करण्यात येत आहे.
स्थानिकांच्या म्हणण्यानुसार, कारवाईदरम्यान करण्यात आलेले नदीकिनाऱ्यावरील खड्डे बुजवून पुन्हा सर्रासपणे नदीपात्रातून वाळूची वाहतूक केली जात आहे. त्यामुळे महसूल विभागाच्या कारवाईची प्रभावी अंमलबजावणी होत आहे का, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
तसेच नव्याने रुजू झालेले मंडळ अधिकारी सचिन मोरे यांनी काही दिवसांपूर्वी तेथून पुढे असलेल्या परिसरात चार ट्रॅक्टर व ट्रॉली वर कारवाई केली आणि त्यानंतर देखील येथे वाळू उपसा सुरू आहे मात्र मंडळ अधिकाऱ्यांना ही माहिती नसेल की याकडे दुर्लक्ष होत आहे.
मेहुणबारे पोलीस ठाण्याचे तत्कालीन सहायक पोलीस निरीक्षक प्रवीण दात्रे यांच्या बदलीनंतर वाळूमाफिया पुन्हा सक्रिय झाल्याची चर्चा परिसरात सुरू आहे. नव्याने रुजू झालेले सहायक पोलीस निरीक्षक या अवैध वाळू उपशाविरोधात कोणती भूमिका घेतात आणि संबंधितांवर कारवाई करतात का, याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.
गिरणा नदीपात्रातील अवैध वाळू उपशामुळे पर्यावरणाचा समतोल बिघडण्याबरोबरच नदीपात्राचे नुकसान होत असल्याने महसूल विभाग, पोलीस प्रशासन आणि संबंधित यंत्रणांनी संयुक्तपणे तातडीने कारवाई करून हा प्रकार कायमस्वरूपी रोखावा, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.
क्रमश……..
