अधिकार आमचा न्युज नेटवर्क
संपादक गफ्फार शेख (मलिक)
उपसंपादक रोहित शिंदे
चाळीसगाव( प्रतिनिधी)- शहरात अन्न व औषध प्रशासनाकडून वेळोवेळी विविध आस्थापनांवर कारवाया व अन्नपदार्थांचे नमुने तपासणीसाठी घेतले जात असल्याचे समोर येते. मात्र या कारवायांची अधिकृत माहिती नागरिकांनाच नव्हे तर पत्रकारांनाही दिली जात नसल्याने प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.
अन्न व औषध प्रशासन आयुक्त पदी तुकाराम मुंढे साहेब आल्यापासून जागे झाले आहे आणि संपूर्ण महाराष्ट्रात कारवाया सुरू आहेत.मात्र चाळीसगाव शहरातील कारवाया होतांना कोणत्या कारणासाठी नमुने घेण्यात आले, कोणत्या पदार्थांचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले, तपासणीचा अहवाल काय आला, संबंधितांवर कोणती कारवाई करण्यात आली किंवा स्वच्छतेबाबत कोणत्या सूचना देण्यात आल्या, याबाबत कोणतीही माहिती सार्वजनिक केली जात नसल्याचे दिसत आहे.
जळगाव जिल्हा अन्न व औषध प्रशासनाच्या अशा गुप्त भूमिकेमुळे कारवायांमध्ये पारदर्शकतेचा अभाव असल्याची भावना नागरिकांमध्ये निर्माण होत आहे. जनतेच्या आरोग्याशी संबंधित विषयांमध्ये माहिती उघडपणे देणे आवश्यक असताना,अन्न व औषध प्रशासनाकडून माहिती लपवली जात असल्याचा आरोप केला जात आहे.
एकीकडे वरिष्ठ आयएएस अधिकारी तुकाराम मुंढे हे जनहिताच्या कामांमध्ये पारदर्शकता ठेवत खुलेपणाने कार्य करत असल्याचे पाहायला मिळत आहे तर दुसरीकडे जळगाव जिल्ह्यातील अन्न व औषध प्रशासनाच्या गुप्त कारवायांमुळे हे प्रशासन नेमके जनतेच्या हितासाठी काम करत आहे की अन्य कोणाच्या हितासाठी,असा सवाल उपस्थित केला जात आहे.नागरिक व पत्रकारांकडून अन्न व औषध प्रशासनाने कारवायांबाबत नियमित प्रसिद्धीपत्रके, नमुन्यांची माहिती, तपासणी अहवाल आणि झालेल्या कारवाईचा तपशील सार्वजनिक करावा,अशी मागणी होत आहे.
