अधिकार आमचा न्युज नेटवर्क
संपादक गफ्फार शेख (मलिक)
उपसंपादक रोहित शिंदे
जळगाव(प्रतिनिधी) : रामानंद नगर पोलीस ठाण्याच्या पथकाने पिंप्राळा परिसरातील सोमानी मार्केट येथील पान मसाल्याच्या दुकानात झालेल्या घरफोडीचा गुन्हा अवघ्या काही दिवसांत उघडकीस आणत दोन आरोपींना अटक केली आहे. विशेष म्हणजे चोरीस गेलेला ३७ हजार ८०० रुपयांचा संपूर्ण मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला आहे.
दि. ७ जुलै २०२६ रोजी अज्ञात चोरट्यांनी सोमानी मार्केटमधील पान मसाल्याच्या दुकानाचे शटर उचकटून विविध कंपन्यांच्या सिगारेटचे १० बॉक्स तसेच रोख रक्कम असा एकूण ३७,८०० रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला होता. याप्रकरणी फिर्यादी यांच्या तक्रारीवरून रामानंद नगर पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक २०४/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहिता कलम ३०५(अ), ३३१(३) व ३३१(४) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता.
या गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी रामानंद नगर पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी पोलीस निरीक्षक मधुकर साळवे यांना सखोल तपास करून आरोपींना तातडीने अटक करण्याच्या तसेच चोरीचा मुद्देमाल जप्त करण्याच्या सूचना दिल्या. त्यानुसार विशेष तपास पथकाची स्थापना करण्यात आली. पथकाने गोपनीय माहिती संकलन, तांत्रिक विश्लेषण आणि परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची बारकाईने तपासणी केली.
या तपासादरम्यान मिळालेल्या गोपनीय माहिती, तांत्रिक पुरावे आणि सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे सिद्धार्थ विनोद आढाळे (वय १९, रा. पिंप्राळा हुडको, जळगाव) आणि दिपक भगवान सोनवणे (वय २०, रा. पिंप्राळा हुडको, जळगाव) या दोघांना ताब्यात घेण्यात आले. पोलिसांनी केलेल्या कसून चौकशीत दोघांनीही घरफोडीची कबुली दिल्यानंतर त्यांना अटक करण्यात आली. तसेच गुन्ह्यात चोरीस गेलेला संपूर्ण मुद्देमालही जप्त करण्यात आला.
ही उल्लेखनीय कारवाई पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक संदीप गावित आणि उपविभागीय पोलीस अधिकारी नितीन गणापूरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक मधुकर साळवे यांच्या नेतृत्वात पोहेकॉ. सुखाकर अंभोरे, सुशील चौधरी, अतुल चौधरी तसेच पोलीस कॉन्स्टेबल सागर नवघरे यांनी यशस्वीरीत्या पार पाडली.
