अधिकारआमचा न्युज नेटवर्क
संपादक गफ्फार शेख (मलिक)
उपसंपादक रोहित शिंदे
चाळीसगाव(प्रतिनिधी)-चाळीसगाव शहर व तालुक्याच्या सर्वांगीण विकासाला नवी दिशा देणारा ऐतिहासिक सोहळा आज पार पडणार असून, आमदार मंगेश चव्हाण यांच्या पुढाकारातून साकारलेल्या विविध विकासकामांचे लोकार्पण तसेच नव्या प्रकल्पांचे भूमिपूजन मान्यवरांच्या हस्ते होणार आहे. प्रशासकीय, आरोग्य, पाणीपुरवठा आणि पायाभूत सुविधांच्या बळकटीसाठी ९० कोटी रुपयांहून अधिक खर्चाच्या विविध प्रकल्पांचा शुभारंभ होत असल्याने चाळीसगावच्या विकासाच्या वाटचालीत हा महत्त्वाचा टप्पा मानला जात आहे.
या कार्यक्रमाचे उद्घाटन जलसंपदा मंत्री ना. गिरीशभाऊ महाजन यांच्या शुभहस्ते होणार असून, जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील हे अध्यक्षस्थानी राहणार आहेत. विविध मान्यवर, लोकप्रतिनिधी, अधिकारी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत.
कार्यक्रमाची सुरुवात सायंकाळी ५.३० वाजता टाकळी प्र. चा. येथे २१.३२ कोटी रुपयांच्या नवीन पाणीपुरवठा योजनेच्या लोकार्पणाने होईल. त्यानंतर वीर सावरकर चौक येथील १.६५ कोटी रुपयांचे सह दुय्यम निबंधक कार्यालय, करगाव रेल्वे बोगदा रोडवरील ६.४० कोटी रुपयांचे प्रांताधिकारी कार्यालय व प्रांताधिकारी-तहसीलदार निवासस्थाने, १३.२३ कोटी रुपयांची ग्रामीण रुग्णालय कर्मचारी निवासस्थाने, स्टेशन रोडवरील ९.४१ कोटी रुपयांचे ‘रायगड’ व्हीआयपी शासकीय विश्रामगृह तसेच ३.६३ कोटी रुपयांची सार्वजनिक बांधकाम विभाग कर्मचारी निवासस्थाने यांचे लोकार्पण करण्यात येणार आहे.मुख्य कार्यक्रम सायंकाळी ७ वाजता कोर्टाशेजारील नव्याने उभारलेल्या पंचायत समिती प्रशासकीय इमारतीत होणार आहे. यावेळी ८.५० कोटी रुपयांच्या खर्चातून उभारलेल्या नवीन पंचायत समिती प्रशासकीय इमारतीचे लोकार्पण तसेच २६ कोटी रुपयांच्या अत्याधुनिक उपप्रादेशिक परिवहन (आरटीओ) कार्यालयाच्या इमारतीचे भूमिपूजन करण्यात येणार आहे.
या विकासकामांमुळे चाळीसगावच्या प्रशासकीय यंत्रणेला आधुनिक सुविधा उपलब्ध होणार असून, आरोग्य सेवा अधिक सक्षम होईल, ग्रामीण भागातील पाणीपुरवठा व्यवस्था सुधारेल आणि नागरिकांना विविध शासकीय सेवा अधिक कार्यक्षम पद्धतीने मिळतील.
चाळीसगावच्या विकासाची वारी आता प्रत्येक घरापर्यंत पोहोचत आहे. नागरिकांच्या सोयी-सुविधा वाढविण्यासाठी आणि शहराच्या सर्वांगीण प्रगतीसाठी ही विकासकामे महत्त्वाची ठरणार आहेत.” या ऐतिहासिक विकास सोहळ्यास सर्व नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे – आमदार मंगेश चव्हाण
