अधिकार आमचा न्युज नेटवर्क
संपादक गफ्फार शेख (मलिक)
उपसंपादक रोहित शिंदे
चाळीसगाव(प्रतिनिधी)- शहरातील मुख्य बस स्थानक परिसरात येणाऱ्या रस्त्यांची अवस्था पावसामुळे अत्यंत खराब झाली असून ठिकठिकाणी चिखल आणि पाणी साचल्याने नागरिकांना चालणेही कठीण झाले आहे. विशेषतः दररोज प्रवासासाठी बस स्थानकात येणारे प्रवासी, विद्यार्थी, महिला आणि ज्येष्ठ नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे.

सद्या सुरू असलेल्या पावसामुळे बस स्थानकात प्रवेश करण्यासाठी असलेल्या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात चिखल साचला असून पादचाऱ्यांना सुरक्षितपणे चालण्यासाठी जागा उरलेली नाही.बस पकडण्यासाठी धावपळ करणाऱ्या प्रवाशांना चिखलातून वाट काढावी लागत आहे. अनेकदा घसरून पडण्याचा धोका निर्माण होत असल्याने नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे.शाळा आणि महाविद्यालयीन विद्यार्थी रोज या मार्गाने ये-जा करतात. तसेच महिला व वृद्ध प्रवाशांनाही बस स्थानकात पोहोचण्यासाठी मोठी कसरत करावी लागत आहे.
पावसाच्या पाण्यामुळे बस स्थानक परिसरात खड्डेही दिसत नसल्याने अपघाताची शक्यता वाढली आहे.स्थानिक नागरिकांनी प्रशासनाने तातडीने या रस्त्याची साफ सफाई करत करून चिखलामुळे तुंबत असलेल्या पाण्याची समस्या दूर करावी, तसेच प्रवाशांसाठी सुरक्षित आणि सुकर मार्ग करून द्यावा, अशी मागणी प्रवासी करत आहे. बस स्थानक हे शहरातील महत्त्वाचे केंद्र असल्याने प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष देण्याची गरज असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.
