अधिकार आमचा न्युज नेटवर्क
संपादक गफ्फार शेख (मलिक)
उपसंपादक रोहित शिंदे
चाळीसगाव(प्रतिनिधी)-दि. ३० व ३१ जुलै २०२६ रोजी झालेल्या अतिवृष्टीमुळे चाळीसगाव तालुक्यातील अनेक गावांतील शेतीपिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांचे तात्काळ पंचनामे करून शासनाने योग्य नुकसानभरपाई द्यावी, या मागणीसाठी वंचित बहुजन आघाडी, चाळीसगाव तालुक्याच्या वतीने दि ४ ऑगस्ट रोजी तहसीलदारांना निवेदन देण्यात आले.
निवेदनात अतिवृष्टीमुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांच्या नुकसानीचे तातडीने संयुक्त पंचनामे करण्यात यावेत, पात्र शेतकऱ्यांना शासनाकडून आर्थिक मदत व नुकसानभरपाई मिळावी, पीक विम्याचा लाभ त्वरीत मिळवून द्यावा तसेच कृषी कर्जवसुलीस स्थगिती देण्यात यावी,अश्या मागण्या करण्यात आल्या आहेत.
याशिवाय नुकसान झालेल्या शेती, शेतरस्ते आणि बांधांच्या पुनर्बांधणीसाठी विशेष निधी उपलब्ध करून देण्याची मागणीही निवेदनाद्वारे करण्यात आली. अतिवृष्टीमुळे अनेक शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले असून शासनाने तातडीने मदतीसाठी पुढाकार घ्यावा, अशी भूमिका वंचित बहुजन आघाडीने मांडली.
यावेळी वंचित बहुजन आघाडीचे चाळीसगाव तालुकाध्यक्ष संदीप अण्णा कांबळे, चाळीसगाव शहराध्यक्ष सागर जिभाऊ निकम, महासचिव गौतम रतन निकम, उपाध्यक्ष चेतन पवार, उपाध्यक्ष मनोज कमलाकर देशमुख यांच्यासह सामाजिक कार्यकर्ते नारायण पाटील, प्रशांत मोरे, तुषार मोरे, प्रदीप मोरे, हेमराज पाटील, शुभम गुजर, शशिकांत सोनवणे, सागर धनगर तसेच आघाडीचे अन्य पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
शेतकऱ्यांच्या मागण्यांवर तातडीने कार्यवाही न झाल्यास लोकशाही मार्गाने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही यावेळी वंचित बहुजन आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी दिला.
