अधिकार आमचा न्युज नेटवर्क
संपादक गफ्फार शेख (मलिक)
उपसंपादक रोहित शिंदे
चाळीसगाव(प्रतिनिधी)-तालुक्यातील पाटणादेवी मंदिराच्या पाठीमागे असलेल्या धवलतीर्थ धबधब्यात पोहण्यासाठी गेलेल्या युवकाचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना आज दि ८ ऑगस्ट रोजी संध्याकाळी ५ ते ६ च्या दरम्यान घडली. कृष्णा संतोष गायकवाड (वय 23, रा. चिकलठाणा, हल्ली मुक्काम कन्नड, जि. संभाजीनगर) असे मृत युवकाचे नाव आहे.
मिळालेल्या माहितीनुसार,धवलतीर्थ धबधब्याच्या परिसरात पोहण्यासाठी गेला असताना कृष्णा गायकवाड यांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच वन विभाग व ग्रामीण पोलिस प्रशासनाने तत्काळ घटनास्थळी धाव घेत बचावकार्य सुरू केले.
यावेळी कैलास नथू चव्हाण (वनपाल) व राजाराम हिरासिंग चव्हाण (वनपाल, रा. पाटणादेवी) यांनी पाण्यात उतरून मृतदेह बाहेर काढण्यासाठी महत्त्वाची मदत केली. त्यानंतर मृतदेह पुढील वैद्यकीय तपासणीसाठी चाळीसगाव ट्रामा केअर सेंटर(ग्रामीण रुग्णालय) येथे हलविण्यात आला.
यावेळी ग्रामीण पोलिस ठाण्याचे एपीआय विजय माळी, पोलीस हवालदार प्रवीण संगिले,अकरम बेग, पोलीस नाईक भगवान माळी तसेच पोलीस कॉन्स्टेबल दत्ताराम पवार यांनी घटनास्थळी उपस्थित राहून बचावकार्य व आवश्यक मदतकार्य केले.
या दुर्दैवी घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून धबधबा परिसरात येणाऱ्या पर्यटकांनी पाण्यात उतरताना आवश्यक खबरदारी घेण्याचे आवाहन करण्यात येत आहे.
