अधिकार आमचा न्यूज नेटवर्क
संपादक गफ्फार शेख (मलिक)
चाळीसगाव(प्रतिनिधी)- तालुक्यातील बहुसंख्य ग्रामपंचायतींमध्ये ग्रामसेवक आणि सचिव यांची सातत्याने गैरहजेरी राहत असल्याने ग्रामस्थांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे. तुरळक गाव वगळता इतर सर्व गावांमध्ये हे चित्र असून, गावकारभार ठप्प झाल्याने नागरिकांना दाखले, प्रमाणपत्रे यांसारख्या मूलभूत सेवा मिळण्यात मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे.
या पार्श्वभूमीवर अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समिती आणि ब्रिक्स ह्यूमन राइट्स मिशनच्या वतीने दि 1 जुलै रोजी चाळीसगावचे उपविभागीय अधिकारी यांच्याकडे लेखी निवेदन सादर करण्यात आले. नाशिक,जळगाव,चाळीसगाव अशा ठिकाणी राहत आहेत तसेच महिन्यातून 1 ते 2 वेळा नियुक्त असलेल्या ठिकाणी हजेरी लावत असतात यामुळे ग्रामस्थांना दाखले मिळण्यास अडचणी निर्माण होतात तसेच ग्रामसेवकांची मनमानी, मुख्यालयी राहण्याचे नियम धाब्यावर बसवणे, कार्यालयीन वेळेचे उल्लंघन, ग्रामसभा न घेणे, आणि आर्थिक अनियमितता यांविषयी गंभीर आक्षेप नोंदवत या समस्येवर तातडीने उपाययोजना करण्याची मागणी करण्यात आली आहे.
आंदोलनाचा इशारा:
संघटनांनी प्रशासनाला एक महिन्याची मुदत दिली असून, त्या कालावधीत सर्व ग्रामसेवक व सचिवांनी संबंधित मुख्यालयीच राहून कार्यालयीन वेळेनुसार नियमितपणे हजर राहावे, अशी ठाम मागणी करण्यात आली आहे. अन्यथा संघटना तीव्र आंदोलन छेडणार असल्याचा स्पष्ट इशारा दिला आहे.
प्रमुख उपस्थिती:
निवेदन सादर करताना समितीचे तालुका अध्यक्ष श्री. नवनाथ मांडे, महिला तालुकाध्यक्ष निर्मलाताई चौधरी, उपाध्यक्ष अनिल राठोड, कार्यकारी अध्यक्ष भिकन पाटील, तसेच ब्रिक्स ह्यूमन राइट्स मिशनचे तालुकाध्यक्ष महेंद्र सूर्यवंशी, मनीषा मांडे, राजेंद्र चौधरी आणि बबलू अहिरे यांची प्रमुख उपस्थिती होती.
