अधिकार आमचा न्युज नेटवर्क
जळगाव प्रतिनिधी शाहिद खान
जळगाव(प्रतिनिधी)–दिनांक 10 ऑगस्ट रोजी वेस्टर्न इंडिया फुटबॉल असोसिएशन (WIFA) च्या मान्यतेने आणि जळगाव जिल्हा फुटबॉल असोसिएशनच्या आयोजनातून, अस्मिता फुटबॉल स्पर्धा – १३ वर्षाखालील मुलींसाठी या स्पर्धेची उत्साही सुरुवात गोदावरी फाउंडेशनच्या अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या क्रीडांगणावर झाली. उद्घाटन केंद्रीय राज्य क्रीडा मंत्री मा. सौ. रक्षा ताई खडसे यांच्या हस्ते पार पडले.
यावेळी मा. खडसे म्हणाल्या, “भारतासारख्या मोठ्या देशात फुटबॉलमध्ये प्रगती करणे आव्हानात्मक असले तरी अशा स्पर्धा ग्रामीण व शहरी भागातील मुलींना क्रीडा क्षेत्रात करिअर घडवण्याची उत्तम संधी देतात. आजच्या सहभागातून मुलींनी सिद्ध केले आहे की त्या कुणापेक्षा कमी नाहीत.” त्यांनी जिल्हा फुटबॉल संघटनेच्या उत्कृष्ट कार्याबद्दल सचिव फारुक शेख यांचे कौतुक केले आणि भविष्यात अशा स्पर्धा सुरू राहतील याची ग्वाही दिली.
संयुक्त सहकार्याने आयोजन
ही स्पर्धा खेलो इंडिया अंतर्गत क्रीडा व युवा मंत्रालय, भारत सरकार; स्पोर्ट्स ऑथॉरिटी ऑफ इंडिया, ऑल इंडिया फुटबॉल फेडरेशन यांच्या मान्यतेने, WIFA, मुंबई व जळगाव जिल्हा फुटबॉल असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने आणि गोदावरी फाउंडेशनच्या सहकार्याने आयोजित झाली.
उपस्थित मान्यवर
उद्घाटन सोहळ्यास डॉ. केतकी पाटील, जागतिक विजेती व शिवछत्रपती पुरस्कार विजेत्या आयशा खान, सचिव फारुक शेख, प्राचार्य डॉ. विजयकुमार पाटील, आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ पंच प्रवीण ठाकरे आदी मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमातील क्षणचित्रे
मा. खडसे यांनी क्रीडांगण पूजन करून नाणेफेक करत स्पर्धेची सुरुवात केली. त्यांनी सेंट मेरी, एरंडोल विरुद्ध नागरिक शिक्षण मंडळ, तामसवाडी-पारोळा तसेच अक्सा स्पोर्ट्स क्लब विरुद्ध मिल्लत हायस्कूल या दोन सामने प्रत्यक्ष पाहिले. सामन्यांपूर्वी व नंतर खेळाडूंना शुभेच्छा देऊन त्यांच्यासोबत छायाचित्रे काढली.
पहिल्या दिवशीचे निकाल
मिल्लत हायस्कूल 1 : 0 अक्सा फुटबॉल क्लब
नागरिक शिक्षण मंडळ, तामसवाडी 3 : 0 सेंट मेरी, एरंडोल
पोदार इंटरनॅशनल 2 : 0 गोदावरी फाउंडेशन
ताप्ती, भुसावळ 2 : 0 पोदार फुटबॉल क्लब
आयोजनासाठी योगदान देणारे
फारुक शेख, प्रा. डॉ. अनिता कोल्हे, मनोज सुरवाडे, अॅड. आमिर शेख, पीएसआय भास्कर पाटील, नितीन डेव्हिड, थॉमस डिसोझा, वसीम रियाज, साबीर खलील, अरबाज खान, तहसील शेख, वसीम चांद, मोजेस चार्ल्स, राहील अहमद, अनस शेख, अयान पटेल, अली शेख, आवेश खाटीक, सैफ शेख, मोहम्मद कैफ नूर, दानिश पिंजारी आदींच्या मेहनतीने कार्यक्रम यशस्वी पार पडला.
