अधिकार आमचा न्युज नेटवर्क
जळगाव प्रतिनिधी शाहिद खान
जळगाव(प्रतिनिधी)– शनिपेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीत हद्दपारी आदेशाचे उल्लंघन करून राहणाऱ्या दोन आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
आमदार मंगेश चव्हाण यांच्या वाढत्या लोकप्रियतेसह सुरू आहे शहराच्या विकासाचा प्रवास
माहितीनुसार, शनिपेठ पोलीस स्टेशन हद्दीतील गुन्हेगारी प्रवृत्तीचे आरोपी 1) तेजस दिलीप सोनवणे यास मा. उपविभागीय दंडाधिकारी जळगाव यांनी तसेच 2) सागर ऊर्फ बीडी सुरेश सपकाळे यास मा. पोलीस अधीक्षक सो यांनी कायदेशीर तरतुदीनुसार ठराविक कालावधीसाठी जिल्ह्यातून हद्दपार केले होते.
तथापि, दिनांक 20 ऑगस्ट 2025 रोजी संध्याकाळी पेट्रोलींग दरम्यान गोपनीय माहितीवरून पोलीस निरीक्षक श्रीमती कावेरी कमलाकर यांना समजले की सदर आरोपी कोणतेही वैध कारण किंवा परवानगी न घेता आपल्या घरी वास्तव्य करीत आहेत. यावर तात्काळ कारवाई करत निरीक्षक कमलाकर यांच्यासह गणेशकुमार नायकर, दिपक गजरे, शशिकांत पाटील, गणेश ढाकणे, नवजीत चौधरी व काजोल सोनवणे यांच्या पथकाने छापा टाकून आरोपींना घरातून ताब्यात घेतले. त्यांच्या विरोधात महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम 142 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दरम्यान, यापूर्वी दिनांक 07 ऑगस्ट 2025 रोजी एम.आय.डी.सी. पोलीस ठाण्याच्या हद्दीतील हद्दपार आरोपी स्वप्नील ऊर्फ गोल्या धर्मराज ठाकुर हा शनिपेठ पोलीस स्टेशन हद्दीत डी.एन.सी. कॉलेज परिसरात गावठी पिस्तूलासह दहशत माजवित असताना पोलिसांच्या ताब्यात आला होता. त्याच्यावर शस्त्र अधिनियम कलम 3, 25 सह महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम 142 अन्वये गुन्हा नोंदविण्यात आला होता.
पोलिसांच्या या कारवाईमुळे हद्दपारी आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायद्याने कठोर कारवाई होत असल्याचे स्पष्ट झाले आहे.
