अधिकार आमचा न्युज नेटवर्क
जळगाव प्रतिनिधी शाहिद खान
जळगाव(प्रतिनिधी) : पाचोरा तालुक्यातील घडलेल्या घटनेचा निषेध करत सै. नियाज अली भैय्या फाऊंडेशनतर्फे राज्यात वाढत्या महिला व अल्पवयीन मुलींवरील अत्याचाराच्या घटनांबाबत तीव्र संताप व्यक्त करण्यात आला. अशा अमानुष कृत्यांना आळा बसावा यासाठी शरिया कायद्यानुसार बलात्कार करणाऱ्या नराधमांना मृत्युदंडाची शिक्षा देण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
संस्थेच्या प्रतिनिधींनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, आपल्या महाराष्ट्रात महिला व मुलींवरील बलात्कार, विनयभंगाच्या घटना सातत्याने वाढत आहेत. कायद्याची भीती संपल्याने नराधमांची हिम्मत वाढली असून समाजातील आया-बहिणी असुरक्षित झाल्या आहेत. म्हणून इस्लामी शरिया कायद्यानुसार बलात्कार्यांना मृत्युदंडाची शिक्षा झाल्यास असे कृत्य करण्याची कोणाची हिंमत होणार नाही.
तसेच शाळा-महाविद्यालयीन बसमध्ये विद्यार्थिनींच्या सुरक्षेसाठी महिला वाहकांची नियुक्ती करावी, प्रत्येक वाहनात जीपीएस प्रणाली बसवावी आणि अशा ठिकाणी कार्यरत व्यक्तींची पोलीस चारित्र्य पडताळणी अनिवार्य करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
निवेदनात आणखी म्हटले आहे की, चोपडा तालुक्यातील एका बस वाहकाने पाच वर्षीय विद्यार्थ्याचे मासिक पास संपल्याने त्याला भर पावसात, निर्मनुष्य ठिकाणी उतरवून दिले. संबंधित विद्यार्थ्याचे घर पाच किलोमीटर अंतरावर असल्याने त्याच्या जीवाला धोका निर्माण होण्याची शक्यता होती. अशा हलगर्जीपणाबद्दल संबंधित वाहकावर कठोर कारवाई करून पुढे असे प्रकार घडू नयेत, यासाठी परिवहन विभागाला आदेश द्यावेत, अशी मागणीही करण्यात आली आहे.
हे निवेदन सै. नियाज अली भैय्या फॉउंडेशनतर्फे आज महामहिम मुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य, मुंबई यांना मा. जिल्हाधिकारी जळगाव यांच्या माध्यमातून सादर करण्यात आले. या प्रसंगी सै. अयाज अली नियाज अली, हाजी शकुर बादशाह, शेख जमील, आसीफ शाह, अमान बिलाल, शेख शफी, सय्यद इरफान, कामिल खान, शेख अरसलान आदी उपस्थित होते.
