अधिकार आमचा न्यूज नेटवर्क
प्रतिनिधी विजय जाधव
दौंड(प्रतिनिधी)-केंद्रप्रमुखावर गुन्हा दाखल करून निलंबित करण्याची कास्ट्राईब शिक्षक महासंघाची मागणी .
सदर घटनेबाबत आमच्या प्रतिनिधीशी बोलताना महाराष्ट्र राज्य कास्ट्राईब शिक्षक महासंघाचे राज्याध्यक्ष गौतम कांबळे म्हणाले की, दापोडे तालुका वेल्हे केंद्राचे केंद्रप्रमुख दिलीप राजगुरू यांनी केंद्रातील मागासवर्गीय शिक्षकाला अश्लील भाषेत जातीवाचक शब्द वापरून शिवीगाळ केली तसेच जीवे मारण्याची धमकी दिली .याबाबत वेल्हा पंचायत समितीचे गट विकास अधिकारी यांच्याकडे लेखी तक्रार दिली असून दिलीप राजगुरू या केंद्रप्रमुखावर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे .संबंधित शिक्षकाची कास्ट्राईब शिक्षक महासंघाकडेही तक्रार आली असून त्या अनुषंगाने पुणे जिल्हा परिषदेचे मुख्यकार्यकारी अधिकारी ,उपमुख्य कार्यकारी अधिकारी सामान्य प्रशासन विभाग ,शिक्षणाधिकारी प्राथमिक, गटविकास अधिकारी व गटशिक्षणाधिकारी पंचायत समिती वेल्हे यांना निवेदन पाठवण्यात आले असून संबंधित केंद्रप्रमुखावर गुन्हा दाखल करून निलंबन करण्याची मागणी केली आहे .वेल्हा पंचायत समितीने तालुक्यात शुक्रवारी शिक्षण परिषदेचे आयोजन केले होते .शिक्षण परिषद ऑनलाईन घेण्याचे आदेश असूनही ऑफलाइन घेण्यात आली ही बाब गंभीर आहे.केंद्रप्रमुखांनी संबंधित शिक्षकाला शिक्षण परिषदेचे ठिकाण चुकीचे कळविले .संबंधित शिक्षक त्या ठिकाणी गेले असता ही बाब त्यांच्या निदर्शनास आली .शिक्षण परिषद त्यांना कळविलेल्या ठिकाणी आयोजित केलेली नसुन दुसर्याच ठिकाणी असल्याचे त्यांना दिसून आले .केंद्रप्रमुख दिलीप राजगुरू यांना तसेच मुख्याध्यापकांना फोन करून शिक्षण परिषदेच्या ठिकाणाची माहिती विचारली .परंतु दोघांनीही फोन उचलले नाहीत .दुसऱ्या केंद्रप्रमुखांशी संपर्क झाल्यानंतर शिक्षण परिषदेच्या बदललेल्या ठिकाणी हे शिक्षक गेले . तेथे गेल्यावर केंद्रप्रमुख दिलीप राजगुरू यांना चुकीचे ठिकाण का सांगितले ? योग्य ठिकाण मला का सांगितले नाही ? अशी विचारणा केली असता केंद्रप्रमुख दिलीप राजगुरू यांनी मागासवर्गीय शिक्षकाला अर्वाच्य भाषेत जातीवाचक शब्द वापरून शिवीगाळ केली व जीवे मारण्याची धमकी दिली .ही बाब गंभीर असून मागासवर्गीय शिक्षकाच्या जीविताचे रक्षण करण्यासाठी केंद्रप्रमुख दिलीप राजगुरू यांच्यावर गुन्हा दाखल करून ताबडतोब निलंबन करण्यात यावे . याबाबतचे निवेदन जिल्हा परिषद पुणे व पंचायत समिती वेल्हे येथील अधिकाऱ्यांना मेलद्वारे व व्हाट्सअपवर पाठवण्यात आले आहे .केंद्रप्रमुखावर त्वरित गुन्हा दाखल करून निलंबन कारवाई न झाल्यास महाराष्ट्र राज्य कास्ट्राईब शिक्षक महासंघाच्यावतीने आंदोलन करण्यात येईल याची जिल्हा परिषद प्रशासनाने नोंद घ्यावी .