अधिकार आमचा न्युज नेटवर्क
संपादक गफ्फार शेख (मलिक)
उपसंपादक रोहित शिंदे
चाळीसगाव (प्रतिनिधी) – मुंबई येथून भडगाव येथे लग्नसमारंभासाठी आलेले चारचाकी वाहन परतीच्या प्रवासात कन्नड घाटात भीषण अपघातग्रस्त झाले. लग्न आटोपून मुंबईकडे परत जात असताना घाटातील म्हसोबा जवळील वळणावर चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने होंडा सिटी चार चाकी गाडी एमएच 01 बीवाय 5371 थेट दरीत कोसळली.दिनांक 26 एप्रिल रोजी दुपारी घडलेल्या या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली.
घाटात खोल दरीत कोसळल्यानंतर वाहन काही अंतर खाली जाऊन झाडात अडकल्यामुळे मोठा अनर्थ टळला. अन्यथा गंभीर जीवितहानी होण्याची शक्यता होती. वाहनात एकूण चार प्रवासी होते. त्यामध्ये दोन पुरुष व दोन महिलांचा समावेश असून, पुरुषांपैकी एक जण पोलिस कर्मचारी असल्याची माहिती समोर आली आहे.
अपघाताची माहिती मिळताच महामार्ग पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. घाटातील अवघड परिस्थितीत बचावकार्य राबवून पोलिसांनी अत्यंत कौशल्याने सर्व प्रवाशांना बाहेर काढले. बचावकार्यादरम्यान काही काळ वाहतुकीवर परिणाम झाला होता.
अपघातात प्रवाशांना किरकोळ दुखापती झाल्याचे समजते. प्राथमिक उपचारासाठी त्यांना जवळील रुग्णालयात हलविण्यात आले असून पुढील तपासणी सुरू आहे. सुदैवाने सर्व प्रवासी जीवितहानीपासून बचावले असल्याने मोठी दुर्घटना टळली आहे.नेमका अपघात कोणत्या कारणांनी झाला याचा तपास सुरू आहे.
घाट परिसरातील धोकादायक वळणे, वेग आणि चालकाची क्षणिक चूक यामुळे असे अपघात घडत असल्याचे पुन्हा एकदा समोर आले आहे. या पार्श्वभूमीवर वाहनचालकांनी घाट रस्त्यांवर अधिक दक्षता बाळगण्याचे आवाहन महामार्ग पोलिस उप निरीक्षक शशिकांत पाटील यांनी केले आहे.
