Oplus_16908288
अधिकार आमचा न्युज नेटवर्क
संपादक गफ्फार शेख (मलिक)
उपसंपादक रोहित शिंदे
चाळीसगाव (प्रतिनिधी) – जिल्हा पोलीस दलातील पोहेकॉ. १७२० राहुल भिमराव सोनवणे हे २३ नोव्हेंबर २००६ रोजी पोलीस शिपाई पदावर भरती झाले असून गेल्या सुमारे १९ वर्षांच्या सेवाकाळात त्यांनी अत्यंत प्रामाणिक, शिस्तबद्ध व कर्तव्यदक्ष कामगिरी बजावली आहे. पोलीस दलाची शिस्त राखणे, टापटीप गणवेश, सिरोमोनियल परेड, बंदोबस्त तसेच गुन्हे तपासात त्यांनी सातत्याने उत्कृष्ट कामगिरी केली आहे. त्यांच्या कार्याची दखल घेत वरिष्ठांकडून वेळोवेळी बक्षिसे व प्रशंसापत्र देऊन गौरविण्यात आले आहे.
सोनवणे यांना गुन्हे तपासाची सखोल माहिती असून खून, खुनाचा प्रयत्न, बलात्कार, दरोडा, जबरी चोरी, घरफोडी, अफरातफर, आर्म अॅक्ट, एनडीपीएस अॅक्ट, बनावट नोटा, फसवणूक, विनयभंग यांसारख्या गंभीर गुन्ह्यांच्या तपासात त्यांनी मोलाचे योगदान दिले आहे. चाळीसगाव शहर पोलीस ठाण्यातील २०२१ मधील पोक्सो कायद्यांतर्गत दाखल प्रकरणात त्यांनी तांत्रिक तपास करून आरोपीविरुद्ध सबळ पुरावे सादर केले. परिणामी न्यायालयाने आरोपीस जन्मठेपेची शिक्षा सुनावली.
पाचोरा पोलीस ठाण्यातील २०१५ मधील तीन गुन्ह्यांतील आरोपींना अटक करून मुद्देमाल हस्तगत करण्यात त्यांनी यश मिळवले असून न्यायालयाने आरोपींना शिक्षा ठोठावली आहे. तसेच २०१४ मधील घरफोडी प्रकरणात गावठी पिस्तूल व जिवंत काडतुसे जप्त करून गुन्हा उघडकीस आणला, तर २०१३ मधील खून प्रकरणातील फरार आरोपीस अटक करण्यातही त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली.त्यांच्या या कामगिरीबद्दल त्यांना विशेष पोलीस महानिरीक्षक, नाशिक परिक्षेत्र यांच्याकडून गौरविण्यात आले आहे.
२६ नोव्हेंबर २०२३ रोजी कन्नड घाटात झालेल्या भीषण अपघातात ३०० फूट खोल दरीत कोसळलेल्या वाहनातील प्रवाशांना वाचवण्यासाठी सोनवणे यांनी जीवाची पर्वा न करता केवळ दोरीच्या सहाय्याने दरीत उतरून ११ जणांना बाहेर काढले आणि त्यापैकी ७ जणांचे प्राण वाचवले. त्यांच्या या धाडसी कार्यामुळे पोलीस दलाची प्रतिमा उंचावली असून त्यांना अपर पोलीस अधीक्षकांकडून विशेष सन्मान मिळाला.
याशिवाय, २०२४ मध्ये एनडीपीएस कायद्यांतर्गत कारवाई करत त्यांनी सुमारे २२ लाख रुपयांचा गांजा व वाहन जप्त केले. विविध गंभीर गुन्ह्यांतील आरोपींना अटक करून गुन्हे उघडकीस आणल्याबद्दल पोलीस अधीक्षक, जळगाव यांनीही त्यांचा गौरव केला आहे.
सोनवणे यांनी त्यांच्या सेवाकाळात एकूण १६४ बक्षिसे प्राप्त केली असून त्यांची सेवा अतिउत्कृष्ट व निष्कलंक राहिली आहे. त्यांच्या उल्लेखनीय कार्याचा गौरव व्हावा म्हणून पोलीस महासंचालक सन्मानचिन्ह व प्रशस्तीपत्र 1 मे महाराष्ट्र दिनानिमित जळगाव पोलिस अधीक्षक कार्यालय येथे मान्यवरांच्या हस्ते त्यांना प्रदान करण्यात येणार आहे.
