जळगाव, दिनांक 27: शहरातील सेंट टेरेसा, आर. आर. हायस्कुल, गुरुकुल विद्यालय (इंग्लिश मिडीयम), सेंट लॉरेन्स, वर्धमान, ओरियंत या शाळेतील विद्यार्थ्यांची वाहतूक करणाऱ्या ऑटोरिक्षा व व्हॅनमध्ये कोंबून बेदरकारपणे आणि धोकादायकपणे वाहतूक करणाऱ्या वाहन चालकांवर उप प्रादेशिक परिवहन विभागाच्यावतीने आज धडक मोहिम राबवून कारवाई करण्यात आली. या मोहिमेतंर्गत तीस ऑटो रिक्षा व व्हॅन उप प्रादेशिक परिवहन कार्यालय, जळगाव येते जप्त करण्यात आल्या आहेत. असे उप प्रादेशिक परिवहन अधिकारी श्याम लोही यांनी कळविले आहे.
उप प्रादेशिक परिवहन विभागच्यावतीने राबविण्यात आलेल्या मोहिमेत बऱ्याचश्या रिक्षा व व्हॅनमध्ये आसन क्षमतेपेक्षा अधिक पटीने विद्यार्थ्यांना कोंबून बसविल्याचे आढळून आले, तसेच अनेक विद्यार्थी चालकाच्या सीटवर बसलेले आढळून आले. काही मुलांचे हात, पाय वाहनाच्या बाहेर आलेले आढळून आले. एका व्हॅनमध्ये 24 मुले धोकादायकपणे प्रवास करतांना आढळून आले. अशा प्रकारच्या वाहनावर कडक कारवाई करण्यात आली आहे. या कारवाई मोहिमेत उप प्रादेशिक परिवहन अधिकारी श्याम लोही यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यालयामधील मोटर वाहन निरीक्षक सचिन दळवी, विकास सूर्यवंशी, दीपक ठाकूर आणि सर्व सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक यांनी सहभाग घेतला होता.
ज्या ज्या शाळेच्या परिसरात धोकादायकपणे वाहतूक करण्यात येते अशा वाहनांवर कारवाई करण्यात येणार आहे. तसेच अशा शाळेच्या प्राचार्यांना या मोहमेअंतर्गत समज देण्यात आली आहे. स्कूल बस समितीचे अध्यक्ष म्हणून ही जबाबदारी प्राचार्यांची असून अशा प्रकारची वाहतूक होऊ नये यासाठी आवश्यक ते प्रयत्न करण्याची गरज आहे. तसेच त्यांच्या शाळेत येणारे विद्यार्थी हे स्कूल बस मधूनच यावी याबाबतचे त्यांनी नियोजन करण्याची आश्यकता असल्याचेही त्यांच्या लक्षात आणून देण्यात आले. असेही उप प्रादेशिक परिवहन अधिकारी श्री. लोहि यांनी कळविले आहे.
Read Time3 Minute, 3 Second