अधिकार आमचा न्यूज नेटवर्क
प्रतिनिधी विजय जाधव
दौंड(प्रतिनिधी)-प्राथमिक शिक्षक बदली प्रक्रियेतील सहावा राऊंड रद्द अथवा स्थगीत करण्यात यावा . या व इतर गंभीर मुद्द्याबाबत धरणे आंदोलन करण्यात येणार आहे .या धरणे आंदोलनाबाबत आमच्या प्रतिनिधीशी सविस्तरपणे बोलताना कास्ट्राईब शिक्षक महासंघाचे राज्याध्यक्ष गौतम कांबळे म्हणाले की ,प्राथमिक शिक्षकांच्या २०२२ च्या बदली प्रक्रियेतील चौथ्या टप्प्यामध्ये अनियमितता झालेली आहे .चौथ्या टप्प्याची बदली प्रक्रिया सुरू होण्यापूर्वी बदली पात्र सेवाजेष्ठ शिक्षकांमधून दुर्गम भागातील रिक्त जागा भरण्यासाठी सेवा जेष्ठता यादी तयार करणे आवश्यक होते .परंतु तसे न करता काही सेवा जेष्ठ शिक्षकांच्या सुगम क्षेत्रातील एका शाळेवरून सुगम क्षेत्रातीलच दुसऱ्या शाळेवर बदल्या करण्यात आल्या .त्यानंतर दुर्गम भागातील रिक्त जागा भरण्यासाठी सेवा जेष्ठता यादी तयार करण्यात आली ,त्यामुळे सेवा कनिष्ठ शिक्षकांची नावे या यादीत आली व त्यांच्या बदल्या दुर्गम भागात झाल्या .हा त्यांच्यावर झालेला अन्याय आहे .तो अन्याय दूर करण्यात यावा .
सध्या केंद्रप्रमुख पदोन्नतीची प्रक्रिया सुरू आहे . यामध्ये पदवीधर शिक्षक या पदावर काम करणाऱ्या शिक्षकांना संधी देण्यात येणार आहे .परंतु त्यातील अनेक शिक्षक बीएड किंवा अन्य तत्सम पदवी घेऊन प्रशिक्षित झालेले नाहीत . आशा अप्रशिक्षित पदवीधर शिक्षकांची केंद्रप्रमुख म्हणून नियुक्ती झाल्यास विद्यार्थ्यांना व शिक्षकांना योग्य मार्गदर्शन मिळणार नाही . त्यामुळे आपण या सर्व बाबीचा गांभीर्याने विचार करावा व प्रशिक्षित असलेल्या उपशिक्षकांनाही केंद्रप्रमुख पदावर काम करण्याची संधी उपलब्ध करून द्यावी .
सर्वोच्च न्यायालयाच्या दिनांक २८ जानेवारी २०२२ च्या निर्णयानुसार तसेच केंद्र शासनाच्या १२ एप्रिल २०२२ च्या मार्गदर्शक सूचनानुसार राज्यातील अधिकारी-कर्मचारी यांना पदोन्नतीतील आरक्षण देण्यात यावे .
बाह्य यंत्रणेमार्फत कंत्राटी कर्मचारी भरतीचा ,ज्यात आरक्षणाचा समावेश नाही असा दिनांक १४ मार्च २०२३ चा शासन निर्णय रद्द करण्यात यावा .
या सर्व गंभीर मुद्द्याबाबत मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री कार्यालयास आपल्या विभागामार्फत कळविण्यात यावे अन्यथा महाराष्ट्रातील सर्व जिल्हाधिकारी कार्यालयावर दिनांक ११ एप्रिल २०२३ रोजी धरणे आंदोलन करण्याचा इशारा निवेदनाद्वारे देण्यात आला आहे .या निवेदनाच्या प्रती गिरीशजी महाजन ,
ग्रामविकास मंत्री , महाराष्ट्र राज्य ,प्रधान सचिव , ग्रामविकास विभाग महाराष्ट्र राज्य ,उपसचिव ,ग्रामविकास विभाग महाराष्ट्र राज्य ,आयुष प्रसाद ,अध्यक्ष , प्राथमिक शिक्षक बदली समन्वय समिती तथा मुख्य कार्यकारी अधिकारी , जिल्हा परिषद पुणे व राहुल कुल ,आमदार दौंड विधानसभा यांना देण्यात आल्या आहेत .