अधिकार आमचा न्युज नेटवर्क
चाळीसगाव (प्रतिनिधी) : चाळीसगाव शहराच्या सर्वांगीण विकासाला गती देत नागरिकांना सुविधा-संपन्न भविष्य देण्यासाठी महत्त्वपूर्ण विकासकामांची मालिका सुरू होत आहे. “चाळीसगाव आता थांबणार नाही” या संकल्पनेनुसार शहरात विविध भव्य प्रकल्पांचे लोकार्पण व भूमिपूजन सोहळे पार पडणार असून, त्यामार्फत शहराच्या आधुनिकतेचा नवा अध्याय लिहिला जाणार आहे.
शहराच्या जलप्रश्नावर दीर्घकालीन उपाय म्हणून २०५६ पर्यंतच्या पाण्याच्या गरजा पूर्ण करणारी ₹१४२ कोटी खर्चाची नवीन पाणीपुरवठा योजनेचे भूमिपूजन तसेच सुवर्णा स्मृती उद्यानाचे आज रविवारी दिनांक २ नोव्हेंबर २०२५ रोजी संध्याकाळी ६ वाजता सुवर्णा स्मृती उद्यान बसस्थानकासमोर चाळीसगाव येथे होत असून, या महत्त्वाकांक्षी प्रकल्पामुळे शहरातील शोभेत तसेच पिण्याच्या पाण्याचा प्रश्न देखील मार्गी लागणार आहे.
या लोकार्पण सोहळ्याला मा. ना. श्री. गिरीषभाऊ महाजन, मंत्री – जनसंपर्क तथा आपत्ती व्यवस्थापन, महाराष्ट्र राज्य प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. या योजनेमागील संकल्पना, पाठपुरावा व विशेष प्रयत्न मा. आ. श्री. मंगेश रमेश चव्हाण (आमदार तसेच जळगाव जिल्हा सहकारी दूध संघ अध्यक्ष) यांचे असून, त्यांच्या प्रयत्नांना आता प्रत्यक्ष रूप मिळत आहे.
विकास यात्रेचा पुढचा अध्याय
याच विकासयात्रेचा पुढचा अध्याय गुरुवार, ६ नोव्हेंबर २०२५ रोजी संध्याकाळी ६ वाजता उलगडणार आहे. या दिवशी तीन महत्त्वपूर्ण प्रकल्पांचे लोकार्पण व भूमिपूजन सोहळे पार पडणार आहेत. यात ₹२६ कोटी खर्चाच्या उपप्रादेशिक परिवहन कार्यालय (RTO – MH 52) चाळीसगावच्या इमारतीचे भूमिपूजन, ₹९.५५ कोटींच्या पंचायत समिती नूतन प्रशासकीय इमारतीचे लोकार्पण, तसेच ₹९.३८ कोटी खर्चाच्या ‘रायगड’ शासकीय VIP विश्रामगृहाचे लोकार्पण करण्यात येणार आहे.
या कार्यक्रमांचे आयोजन पंचायत समिती नूतन प्रशासकीय इमारत, चाळीसगाव येथे करण्यात आले असून, यामुळे चाळीसगाव तालुक्याच्या प्रशासकीय व्यवस्थेत मोठी उन्नती होणार आहे. RTO कार्यालयामुळे नागरिकांना वाहन नोंदणी, परवाना, व करसंबंधी कामांसाठी अन्य शहरांत धावपळ करावी लागणार नाही. तसेच ‘रायगड’ शासकीय विश्रामगृह उपलब्ध झाल्याने चाळीसगाव तालुका पर्यटन, शासकीय बैठकांचे केंद्र व VVIP कार्यक्रमांसाठी नवे आकर्षण बनणार आहे.
चाळीसगाव विकासाच्या 200 कोटी खर्चाच्या विकासकामांचे लोकार्पण व भूमिपूजन सोहळा ही शहराच्या विकासासाठी सुरू असलेली धडाडीची पावले शहराला “निसर्गाच्या सानिध्यात विकसित होणारे आधुनिक शहर” असे नवे स्थान देणार आहेत. सलग विकासकामे, दीर्घकालीन नियोजन, आणि भक्कम संकल्पनेच्या माध्यमातून चाळीसगावचा विकास मार्गक्रमण करत राहणार असल्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
