अधिकार आमचा न्युज नेटवर्क
संपादक गफ्फार शेख (मलिक)
उपसंपादक रोहित शिंदे
जिल्ह्याचा अभिमान – AISSEE 2025 परीक्षेत घवघवीत यश
चाळीसगाव (प्रतिनिधी)- जिल्ह्यातील शैक्षणिक क्षेत्राला अभिमान वाटावा असे यश चाळीसगावच्या इयत्ता पाचवीत शिकणारी कु. शांभवी चेतश्री चंद्रशेखर सोनवणे हिने मिळवले आहे. भारत सरकारच्या संरक्षण मंत्रालयाच्या अंतर्गत येणाऱ्या सैनिक स्कूल सोसायटीतर्फे घेतल्या जाणाऱ्या ऑल इंडिया सैनिक स्कूल एंट्रन्स एग्झाम (AISSEE) 2025 मध्ये शांभवीने उल्लेखनीय कामगिरी करत देशातील प्रतिष्ठित शाळांपैकी एक असलेल्या सैनिक स्कूल कोरुकोंडा (जि. विजयनगरम, आंध्रप्रदेश) येथे प्रवेश मिळवला आहे.
गणित, बुद्धिमत्ता, सामान्यज्ञान व इंग्रजी या विषयांवर आधारित या कठीण प्रवेश परीक्षेत शांभवीने तब्बल 300 पैकी 268 गुण मिळवले. उत्कृष्ट कामगिरीनंतर वैद्यकीय तपासणी प्रक्रियाही यशस्वीरीत्या पार पाडून तिचा प्रवेश निश्चित झाला आहे.ती महाराष्ट्रातून एकमेव विद्यार्थिनी आहे.
सैनिक शाळांचा उद्देश विद्यार्थ्यांना राष्ट्रीय संरक्षण अकादमी (NDA), भारतीय नौदल अकादमी (INA) तसेच इतर संरक्षण सेवांमध्ये प्रवेशासाठी तयार करणे, विद्यार्थ्यांमध्ये शिस्त, नेतृत्वगुण, आत्मविश्वास आणि देशभक्तीची भावना जोपासणे हा आहे. शांभवीने या परंपरेत भर घालत स्वतःचे तसेच जिल्ह्याचे नाव उज्ज्वल केले आहे.
शांभवीने आपल्या यशाचे संपूर्ण श्रेय आई–वडील, काका प्रा. मंगेश बेडसे, प्रा. नवनाथ देशमुख सर आणि तिला शिकवणाऱ्या सर्व शिक्षकांना दिले आहे. यापूर्वी तिने जवाहर नवोदय परीक्षा आणि शिष्यवृत्ती परीक्षातही यश मिळवले होते. सलग तिसऱ्यांदा मिळवलेल्या या मोठ्या यशामुळे तिचे जिल्ह्यात सर्वत्र कौतुक होत आहे.
कु. शांभवी ही सेवानिवृत्त शिक्षणविस्तार अधिकारी श्री. शरद बाजीराव पाटील (साक्री) व सेवानिवृत्त प्राचार्य तथा NCC अधिकारी, जनता विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय झोडगे (ता. मालेगाव, नाशिक) येथील श्री. बी. ए. पाटील यांची नात आहे. आपल्या नातीने मिळवलेल्या या उल्लेखनीय यशाबद्दल त्यांनी अपार समाधान व्यक्त करत उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.
शांभवीच्या या यशामुळे संपूर्ण जिल्ह्यातून तिला शुभेच्छा व अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
