Responsive Menu
Add more content here...
Responsive Menu
Add more content here...

स्त्रीयांना शिक्षणाच्या माध्यमातून नवीन दिशा देणाऱ्या क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची आज जयंती

0 0
Read Time15 Minute, 54 Second

अधिकार आमचा(विशेष): आज क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती बालिका दिन म्हणून सर्वत्र साजरी केली जात आहे समाजात एका बाजूला स्त्रियांबाबत आशादायक चित्र दिसत असताना दुसरीकडे अनेक निर्भया या सारख्या घटनांनी त्यांची होत असलेली असुरक्षितता चिंताजनक असून त्यामुळे अशा साऱ्या समस्यांना भेदणारी सावित्री व तिची विचारधारा आज प्रत्येकाने जगण्याची नितांत गरज आहे लहानपणापासूनच घराघरातील मुलांवर स्त्री-पुरुष समानतेचे उत्तम संस्कार रुजवले जावे तरच पुढे आपली समाज व्यवस्था निकोप व सुदृढ होईल असे वाटते.
एकोणविसाव्या शतकाच्या मध्यार्थात ज्या वेळी भारतासारख्या रूढीवादी परंपरा असणा-या देशात स्त्रीला समाजात ‘चूल आणि मूल ‘ एवढेच स्थान होते, स्त्रीला समाजात कोणता गवही दर्जा नव्हता अशा वेळी तिला शिक्षणाच्या माध्यमातून एक नवी दिशा, नव संजीवनी देण्याचे काम क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांनी केले. पुण्यात शिक्षणाची सोय नव्हती म्हणून जोतिबांनी इ. सवी. सन १८४८ मध्ये मुलींसाठी पहिली शाळा सुरु केली. या शाळेत काम करण्यासाठी शिक्षिका मिळत नसल्याने जोतीरावांनी आपल्या अशिक्षित पत्नीला घरी लिहायला आणि वाचायला शिकवले. पुढे त्यांची शिक्षिका म्हणून नेमणूक केली. आज सावित्रीबाई फुले यांची जयंती. ३जानेवारी १८३१ नायगाव सातारा या ठिकाणी त्यांचा जन्म झाला.
सावित्रीबाईंच्या आईचे नाव लक्ष्मीबाई व वडिलांचे नाव खंडोजी नेवसे पाटील हे गावचे पाटील . इ.स. १८४० साली जोतिराव फुले यांच्याशी सावित्रीबाईंचा विवाह झाला. लग्नाच्या वेळी सावित्रीबाईंचे वय नऊ, तर जोतिरावांचे वय तेरा होते. सावित्रीचे सासरे गोविंदराव फुले हे मुळचे फुरसुंगीचे क्षीरसागर, परंतु पेशव्यांनी त्यांना पुण्यातील फुलबागेची जमीन बक्षीस दिली म्हणून ते पुण्याला येऊन राहिले व फुलांच्या व्यवसायावरून त्यांना फुले हे आडनाव मिळाले.सावित्रीबाईंचे पती जोतिराव यांना लहानपणापासूनच आईचे प्रेम लाभले नाही. त्यांची मावस बहीण सगुणा-आऊ यांनीच त्यांचा सांभाळ केला होता. सगुणाऊ एका इंग्रज अधिकाऱ्याच्या मुलाच्या दाई म्हणून काम करायच्या. त्यांना इंग्रजी कळायचे व बोलताही यायचे. त्यांनी आपल्या या ज्ञानाचा उपयोग जोतिरावांना प्रेरित करण्यासाठी केला. जोतिरावही शिक्षणाकडे आकर्षित झाले. सावित्रीबाईंना ख्रिश्चन मिशनऱ्यांनी लग्नापूर्वी दिलेले एक पुस्तक त्या सासरी घेऊन आल्या होत्या. त्यावरून जोतिरावांनाही एक नवा मार्ग सापडला त्यांनी स्वतः शिकून सावित्रीबाईंना शिकवले. सगुणाऊ तर सोबत होतीच. दोघींनी रीतसर शिक्षण घेतले.
१ मे, इ.स. १८४७ रोजी सावित्रीबाईंनी सगुणाऊला मागासांच्या वस्तीत एक शाळा काढून दिली. ही त्यांची पहिली शाळा. सगुणाऊ तेथे आनंदाने व उत्साहाने शिकवू लागल्या. पुढे ही पहिली शाळा मध्येच बंद पडली.
१ जानेवारी, इ.स. १८४८ रोजी भिडे वाड्यात जोतिराव आणि सवित्रीबाईंनी मुलींची शाळा काढली.१८४८ साल संपेपर्यंत ही संख्या ४०-४५ पर्यंत जाऊन पोहोचली. या यशस्वी शाळेचे स्वागत सनातनी उच्च वर्णीयांनी “धर्म बुडाला…. जग बुडणार…. कली आला….” असे सांगून केले. सनातन्यांनी विरोध केला. अंगावर शेण फेकले. काही उन्मत्तांनी तर अंगावर हात टाकण्याची भाषा केली. अनेक संघर्ष करत हा शिक्षणप्रसाराचा उपक्रम चालूच राहिला. घर सोडावे लागले.अनेक आघात होऊनही सावित्रीबाई डगमगल्या नाहीत.ज्या काळात स्त्रीला समाजात मानाचे स्थान मिळत नव्हते ; शिक्षणापासून आणि स्वातंत्र्यापासून दूर तेवून स्त्रीला परावलंबी आणि परतंत्र ठेवले जात होते
पुढे मात्र सावित्रीबाईना, ज्योतिबा फुले यांचा उदार दृष्टीकोण असल्याने स्वताचे व्यक्तिमत्व घडविण्याची संधी प्राप्त झाली .शिक्षणाच्या प्रसारासाठी अन्य सामाजिक क्षेत्रांतही काम करणे गरजेचे आहे, स्त्रियांचा आत्मविश्वास वाढवणे गरजेचे आहे हे सावित्रीबाईंनी समजून घेतले . पण हे सर्व त्या पतीच्या पावलावर पावूल टाकून अंधपणे करीत नव्हत्या , तर त्या कार्यावर त्याची निष्टा होती , म्हणून पतीनिधनानतरही त्यांनी सत्यशोधक समाजाचे ‘समता आंदोलन’ पुढे चालू ठेवले . सावित्रीबाई शिकल्या तेव्हा त्याच्या ठायी असणारया कविमनाला जे काही आढलले ते त्यांनी कविता आणि अभंगाच्या रुपात शब्दबद्ही केले. १८५४ साली त्याचा ‘काव्यफुले’ हा काव्यसंग्रह प्रसिद्ध झाला. ‘मातोश्री सावित्रीबाईंचे भाषणे व गाणी ‘ या नावाने पुस्तकही १८९१ मध्ये प्रसिद्ध करण्यात आले .
कोण कुठली। कळी फुलांची
जुनी विसर। नवीन पाही
रीत जगाची। उत्सृंखल ही
पाहुनिया मी । स्तिमित होई
या कवितेतून मानवी नराच्या भ्रमरवृत्तीवर प्रतिकरूपाने प्रकाश पाडला आहे. स्त्रीशोषण व पुरुषप्रधान संस्कृतीवर प्रहार केला आहे.
रूप तियेचे करी विच्छिन्न
नकोसे केले तिजला त्याने
शोषून काढी मध तियेचा
चिपाड केले तिला तयाने
या कवितेतून मानवी भावभावनांचे दिग्दर्शन निसर्गप्रतिकातून सावित्री अचूकपणे व समर्थपणे करते. या संग्रहातील उरलेल्या कवितांपैकी काही कविता तिच्या शिक्षकी पेशातून निर्माण झालेल्या आहेत. जोतिरावांच्या सम्यक विचारातून स्फुरलेल्या आहेत. ‘स्वागतपार पद्य, बोलकी बाहुली, सादाकि पद्य, श्रेष्ठ धन, शिकणेसाठी जागे व्हा’ या कविता शिक्षणाशी संबंधित आहेत. जोतिबांना नमस्कार, जोतिबांचा बोध व सावित्री- जोतिबा संवाद या कवितेतून त्यांची पार्श्वभूम‍ी व नाटय़ अतिशय प्रभावी आहे.काव्यलेखनाप्रमाणेच त्यांनी ‘गृहिणी’ या मासिकात लेखही लिहिले . त्याच्या लेखनाला स्वानुभवाचा भक्कम आधार असल्याने ते लेखन परिणामकारक झाले आहेत.
बाला-जरठ विवाहप्रथेमुळे अनेक मुली वयाच्या बारा-तेराव्या वर्षी विधवा व्हायच्या. ब्राह्मण समाजात विधवा-पुनर्विवाह अजिबात मान्य नव्हता. पतीच्या निधनानंतर अशा विधवांना सती जावे लागे किंवा मग त्यांचे केशवपन करून कुरूप बनविले जाई.विरोधाचा अधिकार नसलेल्या या विधवा मग कुणातरी नराधमाच्या शिकार बनत. गरोदर विधवा म्हणून समाज छळ करणार, जन्माला येणाऱ्या मुलाला यातनांशिवाय काहीच मिळणार नाही अशा विचारांनी या विधवा आत्महत्या करत किंवा भ्रूणहत्या करत.फसलेल्या वा बलात्काराने गरोदर राहिलेल्या विधवांचे त्या बाळंतपण करत. गृहातील सर्व अनाथ बालकांना सावित्रीबाई आपलीच मुले मानत. याच ठिकाणी जन्मलेल्या काशीबाई या ब्राह्मण विधवेचे मूल त्यांनी दत्तक घेतले. त्याचे नाव यशवंत ठेवले.
केशवपन बंद करण्यासाठी नाभिक समाजातील लोकांचे प्रबोधन करणे व त्यांचा संप घडवून आणणे, पुनर्विवाहाचा कायदा व्हावा यासाठी प्रयत्न करणे अशी अनेक कामे सावित्रीबाईंनी कल्पकतेने पार पाडली. वयाच्या एकविसाव्या वर्षी ज्योतिरावांनी एक ऐतिहासिक कामात हात घातला त्यांना संपूर्ण साथ देणारी त्यांची पत्नी त्यावेळी अवघ्या अठरा वर्षाची होती एक चांगला विचार एकट्याने करण्याची समविचारी मंडळी एकत्र येऊन काम करावे यासाठी ही संस्था स्थापन केली ज्योतिराव सावित्रीबाईंनी टू फीमेल स्कूल पुणे तसेच दि सोसायटी फॉर प्रोमोटींग एज्युकेशन ऑफ महार, मंगज अंड एक्सट्रा शिक्षण संस्था सुरूकेली सुरू केलेल्या या संस्थेमार्फत त्यांनी पुणे परिसरात शाळांचे जाळे विणले ज्योतिराव सावित्रीबाईंचा मुला-मुलींना श्रमप्रधान शिक्षण देण्यावर त्याकाळी विशेष भर होता. सत्यशोधक समाजाच्या कार्यातही सावित्रीबाईंचा मोठा सहभाग असे.महात्मा फुले यांचे निधन (इ.स. १८९०) झाले. त्यानंतर सावित्रीबाईंनी सत्यशोधक समाजाच्या कार्याची धुरा वाहिली. आपल्या विचारांचा प्रसार त्यांनी आपल्या साहित्याच्या माध्यमातून केला. ‘काव्यफुले’ व ‘बावनकशी सुबोध रत्नाकर’ हे काव्यसंग्रह त्यांनी लिहिले. पुढील काळात त्यांची भाषणेही प्रकाशित करण्यात आली.इ.स. १८९६ साली दुष्काळ पडला. पोटासाठी शरीरविक्रय करणाऱ्या बाया-बापड्यांना दुष्टांच्या तावडीतून सोडवून त्यांनी त्यांना सत्यशोधक कुटुंबांत आश्रयास पाठविले. त्यांच्या कार्याला हातभार म्हणून पंडिता रमाबाई, गायकवाड सरकार अशा लोकांनी मदतीचा हात पुढे केला.
सामजिक कार्यात त्यांचा पुढाकार असे. त्यामुळेच १८७६–७७च्या दुष्काळात त्यांनी खूप कष्ट केले . समजातल्या दिन : दलितांना मायेने जवळ करणाऱ्या, स्त्रियांना शिक्षण मिळावे म्हणून धडपदनाऱ्या सावित्रीबाई खर्या अर्थाने ज्योतिबाच्या सहचरणी म्हणून शोभल्या .
इ.स. १८९६-९७ सालांदरम्यान पुणे व परिसरात प्लेगच्या साथीने धुमाकूळ घातला. हा रोग संसर्गजन्य आहे हे कळल्यावर यातून उद्भवणारे हाल ओळखून सावित्रीबाईंनी प्लेगपीडितांसाठी पुण्याजवळ वसलेल्या ससाणे यांच्या माळावर दवाखाना सुरू केला. त्या रोग्यांना व त्यांच्या कुटुंबीयांना आधार देऊ लागल्या. प्लेगच्या रोग्यांची सेवा करताना सावित्रीबाईंनाही प्लेग झाला. त्यातून मार्च १०, इ.स. १८९७ रोजी त्यांचे निधन झाले.
पुणे येथील हे शिक्षण कार्य पाहून १८५२मध्ये ईस्ट इंडिया कंपनी सरकारने फुले पतिपत्‍नींचा मेजर कॅन्डी यांच्या हस्ते जाहीर सत्कार केला आणि शाळांना सरकारी अनुदानही देऊ केले. त्यानंतरही. सावित्रीबाई फुल्यांनी, भारतातल्या त्या पहिल्या शिक्षिकेने आपले शिक्षण देण्याचे व्रत चालूच ठेवले. त्यांनी ’गृहिणी’ नावाच्या मासिकात काही लेखही लिहिले आहेत.आपल्या दत्तक पुत्र यशवंत चा विवाह देखील त्यांनी सत्यशोधक पद्धतीने केला .
सावित्रीबाईंच्या सामजिक कार्याबद्दल कृतज्ञता म्हणून १९९५ पासून ३ जानेवारी हा सावित्रीबाईचा जन्मदिन हा “बालिकादिन ” म्हणून साजरा केला जातो.केंद्र व राज्य शासनाच्या पातळीवर मुलींच्या शिक्षणासाठी वेगवेगळ्या योजना राबविल्या जात आहेत. आजही बऱ्याच ठिकाणी सुरक्षितता व इतर बाबतीत प्रबोधनाची नितांत गरज आहे.थोर समाज सुधारक क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले सेवा व करुणा यांचा मोठा आदर्श होत्या. त्यांना शिक्षक संघटना राज्य समन्वय समितीच्या वतीने महाराष्ट्र राज्य समता शिक्षक संघाच्या वतीने तसेच आमच्या किशोर पाटील कुंझरकर परिवाराच्यावतीने जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन.
लेखन
किशोर पाटील कुंझरकर.
राज्य समन्वयक राज्य समन्वय समिती शिक्षक संघटना महाराष्ट्र राज्य.7030887190.

Happy
Happy
0 %
Sad
Sad
0 %
Excited
Excited
0 %
Sleepy
Sleepy
0 %
Angry
Angry
0 %
Surprise
Surprise
0 %

Average Rating

5 Star
0%
4 Star
0%
3 Star
0%
2 Star
0%
1 Star
0%

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back To Top
error: Content is protected !!
%d bloggers like this: