हनुमंत विठ्ठल काळे शिपाई अनुदानित माध्यमिक विद्यालय मार्डी तालुका उत्तर सोलापूर यांच्या मृत्यूची गुप्तचर यंत्रणेमार्फत चौकशी करण्यात यावी-महाराष्ट्र राज्य कास्ट्राईब शिक्षक महासंघ

अधिकार आमचा न्यूज नेटवर्क
प्रतिनिधी विजय जाधव
दौंड(प्रतिनिधी)-हनुमंत विठ्ठल काळे या आदिवासी पारधी समाजातील शिपाई पदावर काम करणाऱ्या सहकार्याने शेततळ्यात उडी घेऊन आत्महत्या केली .सोलापूर जिल्ह्यातील उत्तर सोलापूर तालुक्यातील मार्डी येथील खाजगी अनुदानित शाळेत हनुमंत विठ्ठल काळे हे शिपाई म्हणून कार्यरत होते .सन 2016 /17 पासून शालार्थ आयडी न मिळाल्यामुळे त्यांचा पगार बंद होता .शेलार्थ आयडी देण्यासाठी शिक्षण उपसंचालक कार्यालय पुणे येथील अधिकाऱ्यांनी त्यांच्याकडे पाच लाख रुपयांची मागणी केली होती .गरीब परिस्थितीमुळे व अनेक दिवस पगार बंद असल्यामुळे ते पाच लाख रुपये देऊ शकले नाहीत.परिणामी त्यांना शालार्थ आयडी मिळाला नाही व बरेच दिवस पगार बंद राहिल्याने निराश झालेल्या काळे यांनी शेततळ्यात उडी घेऊन आत्महत्या केली .आपल्या वृद्ध आई वडिलांचे तसेच पत्नी व लहान मुलांचे उपासमारीने होणारे हाल त्यांना पाहणे असह्य झाल्याने त्यांनी आत्महत्या करून आपले जीवन संपवले .ही घटना शालेय शिक्षण विभागाच्या कारभाराला काळींबा फासणारी आहे .हनुमंत काळे यांच्या आत्महत्येची सखोल चौकशी करण्यात यावी .शालेय शिक्षकांसाठी आवश्यक असणाऱ्या सुविधा न पुरवणाऱ्या अधिकाऱ्यांवर सदोष मनुष्यवादाचा गुन्हा दाखल करण्यात यावा .शासन त्यांच्या कुटुंबीयांना अनुकंपा तत्वावर नोकरी देईल त्यांच्या पगाराची फरक रक्कम देईल . परंतु त्यांचा जीव गेला त्याला जबाबदार कोण ?त्यांच्या आत्महत्येला जबाबदार असलेल्या व्यक्तींची सखोल चौकशी होणे गरजेचे आहे . उपसंचालक कार्यालय पुणे येथील अधिकाऱ्यांनी वेगळा हेतू मनात ठेवून या शिपाई पदावर काम करणाऱ्या हनुमंत काळे यांना मानसिक व शारीरिक त्रास दिल्याने याची सखोल चौकशी करण्यात यावी व दोषींवर कडक कारवाई करण्यात यावी . अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यान्वये संबंधितांवर गुन्हे दाखल करण्यात यावेत अशी मागणी माध्यमिक व उच्च माध्यमिक विभागाचे शिक्षण संचालक संपत सूर्यवंशी यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे केली आहे .या मागण्याचे निवेदन उपसंचालक माध्यमिक ,माध्यमिक शिक्षण संचालनालय पुणे मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद सोलापूर ,शिक्षणाधिकारी ,माध्यमिक
जिल्हा परिषद सोलापूर ,जिल्हाधिकारी सोलापूर व जिल्हा पोलीस अधीक्षक ग्रामीण सोलापूर यांना देण्यात आल्या आहेत .