Responsive Menu
Add more content here...
Responsive Menu
Add more content here...

सकस आहार, योगासने आणि संगीत दक्षिण सोलापूरच्या कोविड केअर सेंटरमध्ये उपचाराचा अनोखा प्रयत्न…

0
2 0
Read Time10 Minute, 46 Second

अधिकार आमचा न्यूज नेटवर्क

प्रतिनिधी , बसवराज जमखंडी ,सोलापूर

सकस आहार, योगासने आणि संगीत
दक्षिण सोलापूरच्या कोविड केअर सेंटरमध्ये उपचाराचा अनोखा प्रयत्न…

कोरोनाग्रस्तांना योग्य धीर दिला आणि त्यांचे समुपदेशन केले तर बरे होण्याचे प्रमाण वाढत आहे, असे सोलापुरात दिसून येत आहे. सकस आहार, स्वच्छता, करमणूक, योगासन आणि योग्य उपचार मिळाले तर कोरोनाबाधित रूग्ण बरे होण्याचे प्रमाणही लक्षणीय आहे. याची प्रचिती दक्षिण सोलापूर तालुक्याच्या केटरिंग कॉलेजमधील कोविड केअर सेंटरमध्ये येत आहे. हा पॅटर्न जिल्ह्यातील अन्य कोविड केअर सेंटरमध्येही राबविणार असल्याचा मनोदय जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी व्यक्त केला.
सोलापुरातील संभाजी तलावाच्या मागील बाजूला महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचे महाराष्ट्र इंन्स्टिट्यूट ऑफ हॉटेल मॅनेजमेंट ॲन्ड केटरिंग टेक्नालॉजी महाविद्यालय आहे. महाविद्यालय 27 मे 2020 पासून क्वारंटाईनसाठी घेण्यात आले. त्याचे रूपांतर कोविड केअर सेंटरमध्ये करण्यात आले आहे. 20 जुलै 2020 पासून याठिकाणी प्राणायम, योगासने, करमणुकीसाठी भावगीते, सुगम संगीताचा वापर करण्यात येत आहे. या सेंटरमध्ये 338 रूग्णांची सोय होऊ शकते, मात्र सध्या 178 साध्या पॉझिटिव्ह रूग्णांवर उपचार सुरू आहेत. जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाने याठिकाणी रवी कंटला आणि शिवानंद पाटील यांची योग प्रशिक्षणासाठी नियुक्ती केली आहे. याठिकाणी बांधकाम विभागातील उपअभियंता शाहीर रमेश खाडे एक दिवसाआड संगीताचा कार्यक्रम घेत आहेत. शिवाय कोविड सेंटरमध्ये एफएम बसविल्याने रूग्णांची करमणूक होत आहे. दिवसातून चारवेळा स्वच्छता केली जात आहे.
या सेंटरमधील 316 कोरोनाबाधित रूग्णांपैकी 138 रूग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. दुपारी 1 ते सायंकाळी 4 पर्यंत विश्रांतीसाठी संगीत बंद असते. सकाळी 7 ते 8 या वेळात योगासने, प्राणायामचा वर्ग असतो. यामुळे रूग्णांमध्ये असलेली भीती दूर होते. श्वसनक्रिया सुरळित होण्यास मदत होत आहे. बरे झालेले रूग्ण अजून राहण्याची इच्छा व्यक्त करीत असल्याचे डॉ. गायकवाड यांनी सांगितले.

सकस आहार
कोरोनाबाधित रूग्णांना सकाळी दूध, दोन अंडी, दुपारी जेवण आणि फळे, सायंकाळी चहा आणि संध्याकाळी सकस जेवण देण्यात येत आहे. यामुळे त्यांची रोगप्रतिकार शक्ती वाढण्यास मदत होत आहे. घरच्याप्रमाणे योग्य आहार मिळत असल्याने रूग्णांचे मनोधैर्य उंचावत आहे.

स्वच्छता
कोरोनाच्या बाबतीत स्वच्छता महत्वाचा घटक आहे. कोविड केअर सेंटर आणि कोविड हॉस्पिटलमध्ये वेळेवर साफसफाई केली जात असल्याने इतर आजारांचा फैलाव रोखण्यास मदत होत आहे. यामुळे कोरोना रूग्ण बरे होत आहेत.

करमणूक
कोरोनाग्रस्त अगोदरच गांगरून व घाबरून गेलेला असतो. त्याला मानसिक आधार आणि रोग बरा होत असल्याचा विश्वास द्यायला हवा. शिवाय जोडीला संगीत, गाणी यांची साथ असेल तर रूग्णांना आजारी आहे असे वाटणार नाही. गाण्यांमध्ये गुंतून गेल्याने त्याला झोपही चांगली लागते, परिणामी रोग प्रतिकारशक्ती वाढल्याने कोरोनाशी तो मुकाबला करू शकतो.

योगाचा आधार
संगीताचा योग्य परिणाम कोरोनाग्रस्त रूग्णांवर झाल्याने त्यांना व्यायाम, योगासने, प्राणायाम करायला लावली तर आणखी फायदा होणार आहे. प्राणायामने त्यांच्या श्वसनाच्या त्रासामध्ये 70 टक्के सुधारणा झाल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. श्वसनक्रिया सक्षमपणे चालण्यासाठी प्राणायाम महत्वाची आहेत. यामुळे कोविड केअर सेंटर किंवा हॉस्पिटलमध्ये योग तज्ज्ञांची व्यवस्था करण्यात येणार आहे.

योग्य उपचार
सकस आहार, स्वच्छता, संगीत, योगा यानंतर रूग्ण आपोआप योग्य उपचारालाही साथ देतो. मृत्यूदर कमी करण्यास वरील घटक महत्वाचे ठरणार आहेत.

जिल्ह्यातील कोविड केअर सेंटरमध्येही पॅटर्न राबविणार- जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर
रूग्ण बरे होण्यासाठी समुपदेशन महत्वाचे आहे. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, प्रांताधिकारी, तहसीलदार, गटविकास अधिकारी, तालुक्याची आरोग्य यंत्रणा, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या टीमवर्कने केलेल्या कामाचे हे फलित आहे. योगासने, प्राणायाम, संगीत हा पॅटर्न जिल्ह्यातील अन्य कोविड केअर सेंटरमध्येही राबविणार असून समुपदेशकांची नियुक्तीही करण्यात येईल.

रूग्ण बरे होण्याचं प्रमाण वाढतंय- प्रांताधिकारी ज्योती पाटील
प्रांताधिकारी ज्योती पाटील म्हणतात, दक्षिण तालुका हा सोलापूर शहरानजिकचा तालुका आहे. यामुळे शहराजवळच सुसज्ज अशी केटरिंग कॉलेजची इमारत कोविड केअर सेंटरसाठी घेण्यात आली. तहसीलदार, सार्वजनिक बांधकाम विभाग, तालुका आरोग्य अधिकाऱ्यांच्या टीमने सेंटरमध्ये बदल केले. जेवण, दिवसभर स्वच्छता, सॅनिटायझिंग, योगासन वर्ग आणि म्युझिक सिस्टम यामुळे उपचार घेतलेले रूग्ण बरे होऊन आनंदाने बाहेर पडत आहेत, ही समाधानाची बाब आहे.

मनोधैर्य वाढविण्यासाठी समुपदेशकाची गरज- डॉ. दिगंबर गायकवाड
दक्षिण सोलापूरचे तालुका आरोग्य अधिकारी डॉ. दिगंबर गायकवाड म्हणतात, कोरोना रूग्णांना प्रथमत: समुपदेशनाची गरज असते. कोरोना फुफ्फुसावर संसर्ग करतो. रूग्णांची श्वसनक्रिया व्यवस्थित चालण्यासाठी प्राणायाम आणि योगासनांची नितांत गरज वाटली. यामुळे त्यांना दवाखान्यात दाखल करण्याची गरज वाटत नाही. रूग्ण कोविड सेंटरमध्येच बरे होत आहेत. संगीताची जोड दिल्याने त्यांची करमणूकही होत आहे. येत्या काही दिवसात मालेगावमध्ये वापरण्यात आलेला मन्सुरा काढा सुरू करण्याचा मानस आहे.

संगीत, योगासनांचा निश्चितच फायदा- डॉ. प्रसन्न खटावकर
सोलापुरातील प्रसिद्ध मानसोपचारतज्ज्ञ डॉ. प्रसन्न खटावकर म्हणतात, कोरोना काळात वैयक्तिक स्वच्छता, औषधोपचाराबरोबर तणावरहित राहिले तर सकारात्मक परिणाम दिसतात. मानसिकदृष्ट्या सक्षम राहून कोरोनाचा मुकाबला करायला हवा. करमणूक, योगासने, प्राणायम यांचा रूग्णांना फायदा होतो. मन शांत राहते. अतिचिंता, अतिविचार टाळू शकतो. कोविड केअर सेंटरमध्ये वायफायची सुविधा देणे गरजेचे आहे. पुरेशी झोप, योग्य व ताजा आहाराबरोबर योग्य उपचार रोग प्रतिकारशक्ती वाढविण्यास मदत करतात. यामुळे रूग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढून मृत्यूदर कमी होईल.

दिवसातून तीनवेळा तपासणी-डॉ. खारे
केटरिंग कॉलेजच्या कोविड केअर सेंटरचे समन्वयक डॉ. प्रवीण खारे म्हणतात, सहकार्यांच्या मदतीने दिवसातून तीनवेळा राऊंड घेऊन रूग्णांच्या समस्या जाणून घेतो. ह्दयाचे ठोके तपासणे, ऑक्सिजन प्रमाण तपासून औषधाबरोबर प्रतिकारशक्ती वाढण्यासाठी प्रतिजैविके देण्यात येतात. याबरोबरच सोशल डिस्टन्सिंग पाळून संगीत, योगासने याचाही नियमित वर्ग घेतला जातो.

अधिकारी आणि कर्मचारी
तालुका आरोग्य अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली पाच वैद्यकीय अधिकारी, पाच नोडल अधिकारी, सहा आरोग्यसेविका, पाच फार्मासिस्ट, दोन ब्रदर, पाच कक्षसेवक, एक टेक्निशियन, सहा शिपाई, चार होमगार्ड, तीन वॉचमन, बारा सफाई कर्मचारी काम करीत आहेत.

Happy
Happy
0 %
Sad
Sad
0 %
Excited
Excited
0 %
Sleepy
Sleepy
0 %
Angry
Angry
0 %
Surprise
Surprise
0 %

Average Rating

5 Star
0%
4 Star
0%
3 Star
0%
2 Star
0%
1 Star
0%

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

error: Content is protected !!
%d bloggers like this: