अधिकार आमचा न्युज नेटवर्क
जळगाव प्रतिनिधी शाहिद खान
जामनेर(प्रतिनिधी)- दिनांक ४ ऑगस्ट २०२५ रोजी देउळगाव गुजरी (ता. जामनेर) येथील हरीओम अलंकार या सोन्याच्या दुकानात दोन अनोळखी व्यक्तींनी सोनं खरेदी करण्याचा बहाणा करत फिर्यादी चेतन नंदकिशोर विसपुते (वय २६, रा. कापडगल्ली, जामनेर) यांचे लक्ष विचलित करून दुकानातील तब्बल ४ लाख रुपयांचे सोन्याचे दागिने चोरून नेले होते. या प्रकरणी फत्तेपुर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा क्र. १४४/२०२५ बीएनएस कलम ३०५(अ), ३(५) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता.
जळगावचे पोलीस अधीक्षक मा. डॉ. महेश्वर रेड्डी यांच्या आदेशानुसार स्थानिक गुन्हे शाखेने समांतर तपास सुरू केला. वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. संदीप पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोउपनि. शरद बागल यांच्या नेतृत्वात पथकाने घटनास्थळाचा बारकाईने अभ्यास करून आणि तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे विधी संघर्षग्रस्त बालकाला दिनांक 12 ऑगस्ट रोजी ताब्यात घेतले असून चौकशीत त्याने हा गुन्हा मध्य प्रदेशातील दोन साथीदारांसह केल्याची कबुली दिली. सदर बालकाला पुढील कारवाईसाठी फत्तेपुर पोलीस स्टेशनच्या ताब्यात देण्यात आले असून इतर दोन्ही साथीदारांचा शोध सुरू आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधीक्षक श्रीमती कविता नेरकर, प्र. उपविभागीय पोलीस अधिकारी अरुण आव्हाड यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. पथकात पोउपनि. शरद बागल, श्रेणी पोउपनि. रविंद्र नरवाडे, पोहेकॉ/ गोपाल गव्हाळे, उमाकांत पाटील, पोना/ विकास सातदिवे, पोकॉ/ प्रशांत परदेशी, राहुल वानखेडे, चालक पोकॉ/ महेश सोमवंशी सर्व स्थानिक गुन्हे शाखा जळगाव आदींचा समावेश होता.
