अधिकार आमचा न्युज नेटवर्क
संपादक गफ्फार शेख
जळगाव (प्रतिनिधी) : स्थानिक गुन्हे शाखा, जळगाव यांनी गोपनीय माहितीच्या आधारे यशस्वी कारवाई करत जामनेर व भुसावळ शहर पोलीस स्टेशन हद्दीत चोरीस गेलेल्या एकूण तीन मोटरसायकली जप्त केल्या आहेत. या कारवाईत अनुराग लक्ष्मण सूनगत (वय १९, रा. वाकी रोड, हरीओम नगर, जामनेर) व दर्शन बाप्पू चव्हाण (वय १८, रा. संत सेवालाल नगर, जामनेर) या दोन आरोपींना ताब्यात घेण्यात आले असून त्यांची सखोल विचारपूस केली असता त्यांनी आपल्या एका साथीदाराच्या मदतीने सदर तीन मोटरसायकली चोरी केल्याची कबुली दिली आहे.
तपासादरम्यान जामनेर पोलीस स्टेशन येथे दाखल गुन्हा रजिस्टर नंबर १८/२०२६ व ३८/२०२६ (BNS कलम 303(2)) मधील दोन मोटरसायकली तसेच भुसावळ शहर पोलीस स्टेशन येथे दाखल गुन्हा रजिस्टर नंबर १७७/२०२४ (BNS कलम 303(2)) मधील एक मोटरसायकल असा एकूण तीन मोटरसायकलींचा मुद्देमाल आरोपींकडून जप्त करण्यात आला आहे.
जप्त मुद्देमालासह आरोपींना पुढील कायदेशीर कारवाईसाठी जामनेर पोलीस स्टेशन यांच्या ताब्यात देण्यात आले आहे. सदरची कारवाई पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड, पोलीस उपनिरीक्षक शरद बागल, ग्रेड पोलीस उपनिरीक्षक रवी नरवाडे तसेच पो.हे.कॉ. गोपाळ गव्हाडे, उमाकांत पाटील, पो.ना. विकास सातदिवे, पो.कॉ. प्रशांत परदेशी व राहुल वानखेडे यांच्या पथकाने केली.
