अधिकार आमचा न्युज नेटवर्क
संपादक गफ्फार शेख (मलिक)
उपसंपादक रोहित शिंदे
चाळीसगाव (प्रतिनिधी)- रस्त्यावरील वाढत्या अपघातांना आळा घालण्यासाठी व वाहनधारकांमध्ये वाहतूक नियमांबाबत जनजागृती निर्माण करण्याच्या उद्देशाने चाळीसगाव महामार्ग पोलीस केंद्रातर्फे दिनांक ३० जानेवारी शुक्रवार रोजी ‘रस्ता सुरक्षा जनजागृती अभियान’ उत्साहात राबविण्यात आले. या उपक्रमाचे वैशिष्ट्य म्हणजे नियमभंगावर दंडात्मक कारवाई न करता, प्रत्यक्ष कृतीतून सुरक्षिततेचा संदेश देत दुचाकीस्वारांना मोफत हेल्मेटचे वाटप करण्यात आले.
रोटरी क्लब ऑफ चाळीसगाव रॉयल्सचे मोलाचे सहकार्य महामार्ग पोलीस चाळीसगावचे प्रभारी अधिकारी पोलीस उपनिरीक्षक अमोल कवडे यांच्या संकल्पनेतून व विशेष विनंतीवरून रोटरी क्लब ऑफ चाळीसगाव रॉयल्स या सामाजिक संस्थेने निस्वार्थ भावनेने या उपक्रमासाठी हेल्मेट स्वरूपात सहकार्य केले.

थेट रस्त्यावर उतरून समुपदेशन
दुपारी १२.०० ते १.०० या वेळेत राबविण्यात आलेल्या या मोहिमेत विनाहेल्मेट दुचाकी चालविणाऱ्या वाहनचालकांना थांबवून दंड करण्याऐवजी त्यांना गुलाबपुष्प देत सौम्य पद्धतीने समुपदेशन करण्यात आले. “आपले जीवन आपल्या कुटुंबासाठी किती मौल्यवान आहे” हे पटवून देत रोटरी क्लबच्या वतीने त्यांना मोफत हेल्मेट प्रदान करण्यात आले.मान्यवरांची उपस्थितीया स्तुत्य उपक्रमाला शहरातील प्रतिष्ठित नागरिक व रोटरी क्लबचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. त्यामध्ये प्रामुख्याने –डॉ. संदीप देशमुख, श्री. हरिश जैन, श्री. हर्षद ढाके, श्री. शैलेश येवलेयांच्यासह रोटरी क्लब ऑफ चाळीसगाव रॉयल्सचे सर्व सदस्य, महामार्ग पोलीस केंद्रातील अधिकारी, अंमलदार व कर्मचारी उपस्थित होते.
“रस्ते सुरक्षा हा केवळ पोलिसांचा विषय नसून ती प्रत्येक नागरिकाची जबाबदारी आहे. हेल्मेट हे ओझे नसून ते जीवनरक्षक कवच आहे.”— अमोल कवडे, प्रभारी अधिकारी, महामार्ग पोलीस,
चाळीसगाव महामार्ग पोलिसांच्या या उपक्रमाचे तसेच रोटरी क्लबच्या सामाजिक दातृत्वाचे शहर व परिसरातून मोठ्या प्रमाणावर कौतुक होत आहे.
