Oplus_16908288
अधिकार आमचा न्युज नेटवर्क
संपादक गफ्फार शेख (मलिक)
चाळीसगाव(प्रतिनिधी)- तालुक्यातील बहाळ गावातील अडीवाट शिवारातील जुवार्डी रस्त्यालगत दुपारी मक्याच्या शेतात मक्याला पाणी देण्यासाठी गेलेल्या शेतकऱ्यावर बिबट्याने जीवघेणा हल्ला केल्याने परिसरात भीतीचे सावट पसरले आहे.

याबाबत सविस्तर वृत्त असे की,बहाळ गावातील अडीवाट शिवारातील जुवार्डी रस्त्यालगत दुपारी शेतकरी मुकुंदा धोंडू बागुल(वय ६० वर्ष) हे आपल्या शेतातील मक्याच्या पिकाला दिनांक ३१ जानेवारी रोजी शनिवार दुपारी ३ वाजून ३० मिनिटांच्या सुमारास पाणी देत असताना अचानक मागून एका बिबट्याने हल्ला करत पाठीवर दोन ठिकाणी नखे मारली यामुळे घाबरलेल्या बागुल यांनी जोरजोरात आरडा ओरड केल्याने तो बिबट्या पसार झाला आणि बागुल यांचा जीव वाचला.बागुल यांना या हल्ल्यात किरकोळ दुखापत झाली असून त्यांच्यावर मेहुणबारे येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात डॉ तरबेज खान यांनी उपचार करून आवश्यक लस उपलब्ध नसल्याने धुळे येथे लस घेण्यासाठी पाठविले होते,आता लस घेत बागुल हे आपल्या गावी परत आले असून त्यांची प्रकृती व्यवस्थित आहे.या घटनेमुळे ग्रामस्थ घाबरले असून वनविभागाने बिबट्याचा शोध सुरू केला आहे.
घटनेची माहिती मिळताच……
वनविभागाचे वनपाल सी.व्ही. पाटील, वनरक्षक सुनील काळे, रवींद्र पवार, वाहन चालक धिरज पाटील, ज्ञानेश्वर भालेराव यांनी घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. त्यांना घटनास्थळी लहान बिबट्याच्या पायाचे आकाराचे ठसे आढळून आले आहेत.संपूर्ण परिसराची तपासणी करण्यात आली आहे.आता देखील वनविभागाचे कर्मचारी गावात असल्याची माहिती प्राप्त झाली आहे.
